तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर
By राजू इनामदार | Updated: March 12, 2025 18:06 IST2025-03-12T18:05:57+5:302025-03-12T18:06:48+5:30
काँग्रेसमधून भाजप, त्याआधी शिवसेनेत असलेले, असेच सतत पक्ष बदलत असलेले नितेश राणे हिंदुत्व शिकवत असतील तर त्यासारखा विनोद नाही

तुमचे वडील लोकसभेत गेले ते राज ठाकरेंमुळेच हे विसरू नका; योगेश खैरेंचे नितेश राणेंना तिखट प्रत्युत्तर
पुणे : व्हाया काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना हिंदुत्व शिकवण्याच्या फंदात पडू नये, तुमचे वडील नारायण राणे हे लोकसभेत गेले ते राज यांनी सायंकाळी साडेसातनंतर घेतलेल्या सभेमुळेच, अशा तिखट शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते योगेश खैरे यांनी राज्याचे मत्स्य व बंदरेमंत्री नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिले.
महाकुंभमधील गंगाजलाविषयी राज यांनी केलेल्या वक्तव्याचा नितेश राणे यांनी निषेध केला होता. राज यांच्याविषयी त्यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्याला खैरे यांनी पुण्यातून प्रत्युत्तर दिले. खैरे म्हणाले की, आतापर्यंत हिंदुत्वाचे जे जे विषय पुढे आले ते राज ठाकरे यांनीच आणले. बेकायदेशीर बांधकाम करणे, दर्गा बांधणे असो किंवा मशिदींवरचे भोंगे असोत, प्रत्येक वेळी राज यांनी आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला. अशा राज यांना काँग्रेसमधून भाजपत आलेले, त्याआधी शिवसेनेत असलेले, असेच सतत पक्ष बदलत असलेले नितेश राणे हिंदुत्व शिकवत असतील तर त्यासारखा विनोद नाही. त्यांनी या फंदात पडूच नये.
राणे यांचे वडील नारायण राणे लोकसभेला निवडून आले, त्याचे कारण राज ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात सायंकाळी साडेसात वाजता घेतलेली प्रचारसभा हेच आहे. ते नितेश यांनी विसरू नये, असा सल्लाही खैरे यांनी दिला आहे. राज ठाकरे आपली मते, भूमिका अतिशय परखडपणे मांडतात, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. गंगा नदीबाबतच्या त्यांच्या वक्तव्याचे सर्व थरातून स्वागत होत असताना नितेश राणे विनाकारण काहीही बोलत आहेत, त्यांनी आपल्या बोलण्याला आवर घालावा, असे खैरे यांनी म्हटले आहे.