टेन्शन घेऊन हायपर होऊ नका; रक्तदाब नियंत्रणासाठी पुरेशी झोप घ्या, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: October 18, 2023 01:42 PM2023-10-18T13:42:08+5:302023-10-18T13:44:12+5:30
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे
पुणे : अपुऱ्या झोपेमुळे देखील उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवत शकते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोक सलग झोप घेत नाहीत त्यांना सर्वसामान्यांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असल्याचे आढळून आले आहे.
झोपेचा अभाव हे आरोग्याच्या विविध समस्यांशी संबंधित आहे. जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक तयार करते. ज्यामुळे रक्तदाबाचे प्रमाण वाढते. अपुऱ्या झोपेमुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे त्यांची लवचिकता कमी होऊन त्या आकुंचन पावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हृदयाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
एरवी औषधांशिवाय उच्च रक्तदाब कमी होत नाही. परंतू, गाढ झोपेत आपले शरीर रक्तवाहिन्यांच्या कार्यातील अडथळे दूर करते आणि हार्मोनल संतुलन राखते. नियमित आणि पुरेशा झोपेला प्राधान्य दिल्यास आपण केवळ उच्चरक्तदाबचा धोका कमी करू शकत नाही तर त्याच्याशी संबंधित लक्षणे देखील कमी करू शकतो.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या
अपुरी झोप आणि उच्च रक्तदाब यांच्यातील परस्परसंबंध ओळखून संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य उत्तम राखण्यासाठी झोपेच्या सवयींकडे लक्ष द्या. रात्रीच्या वेळी पुरेशी विश्रांती मिळाल्यास दिवसाची सुरुवात चांगली होते. उच्चरक्तदाबासारख्या गंभीर आरोग्य समस्येला प्रतिबंध करण्यासाठी चांगल्या सवयींचे पालन करा. - डॉ. सम्राट शहा, इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट
रात्रीच्या वेळी शांत झोप लागावी यासाठी हे करा
- झोपण्याची एक वेळ निश्चित करा. त्यापूर्वी सोशल मीडिया, टीव्ही, मोबईलचा वापर करणे टाळा.
- पुस्तक वाचणे, ध्यान करणे किंवा दीर्घ श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे तसेच गरम पाण्याने आंघोळ करा.
- झोपण्यापुर्वी किमान 30 मिनिटे आधी सर्व काम संपवा आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्यासाठी चांगले वातावरण तयार करा. तुमच्या बेडरुममधील लाईट बंद करुन शांत आणि चांगल्या झोपेसाठी वातावरण निर्मिती करा.
- झोपण्यापुर्वी व्यायाम करणे टाळावे.दिवसभरात किमान 30 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. वेगाने चालणे,जॉगिंग करणे किंवा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करा.
- रात्रीच्या वेळी कॅफिनयुक्त पेयांचा वापर करणे टाळा.