पोलीस सोबत असल्याशिवाय सर्वेक्षणाला जाऊ नका ; पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मौखिक आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:10 PM2020-04-04T14:10:53+5:302020-04-04T14:11:13+5:30
अनेक ठिकाणी होतोय सर्वेक्षणाला एनआरसी-सीएएच्या नावाखाली विरोध
पुणे : महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करण्यास सुरु वात केली असून कुटुंबातील कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का याची माहिती घेतली जात आहे. परंतू, काही ठराविल मोहल्ल्यांमध्ये मात्र या सर्वेक्षणाला विरोध होत असल्याचे चित्र आहे . त्यामुळे पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय अशा शहरातील कोणत्याही भागात सर्वेक्षणाला जाऊ नये अशा मौखिक सूचना वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना केल्या आहेत.
पालिकेने घरोघरी सर्वेक्षणाकरिता पथके तयार केली आहेत. साधारणपणे दीड हजार कर्मचारी या कामाकरिता नेमण्यात आले आहेत. या पथकांमधील कर्मचाऱ्यांना विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांच्या घेण्याचे तसेच त्यांच्या घरातील व्यक्तींच्या आजारांची माहिती घेण्याचे काम सोपविण्यात आले आहे. परंतू, काही ठराविक भागात या कर्मचा-यांना मज्जाव केला जात आहे. महिला कर्मचाऱ्यांसोबतही वादाचे प्रसंग घडले आहेत. हे कर्मचारी एनआरसी आणि सीएएचे सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले आहेत.
त्यामुळे कर्मचारी दहशतीखाली काम करीत आहेत. या कर्मचा-यांसोबत पोलीस कर्मचारी देण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारी सोबत असल्याशिवाय अशा संवेदनशील भागात सर्वेक्षणाला जाऊ नये, स्वत:ची काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांनी या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरात काही ठिकाणी मात्र प्रशासनाच्या कामाला असहकार केला जात असल्याचे चित्र आहे.