Indian Railway| प्लॅटफॉर्म तिकीट नसेल, तर वीसपट दंड भरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:53 PM2022-02-23T12:53:07+5:302022-02-23T12:58:59+5:30
जो दंड भरत नाही त्याला रेल्वे न्यायालयात हजर करून न्यायालय शिक्षा सुनावते...
पुणे: नातलगांना सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी स्थानकांवर जात असाल तर प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच जा. कारण विना प्लॅटफॉर्म तिकीट सापडाल, तर तुमच्याकडून वीसपटीहून अधिक रकमेचा दंड वसूल केला जाईल. पुणे स्थानकावर जर कोणी विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळले, तर त्यावेळी शेवटच्या चेकिंग स्टेशनपासूनच्या तिकिटाची रक्कम व अडीचशे रुपयाचा दंड वसूल केला जातो. महिन्याभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या व प्लॅटफॉर्म तिकीट नसलेल्या जवळपास २५ हजार प्रवाशाकडून दीड कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट नसलेला व्यक्ती आढळल्यास रेल्वे प्रशासन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते, जो दंड भरत नाही त्याला रेल्वे न्यायालयात हजर करून न्यायालय शिक्षा सुनावते. रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करताना त्यावेळी कोणती रेल्वे आली आहे अथवा कारवाईच्या आधी कोणती रेल्वे आली होती. ती कोणत्या शहरावरून आली आहे. त्याचे ते पुण्याचे तिकीट दर विचारात घेते. शिवाय २५० रुपयांचा दंड आकारते. त्यामुळे दंडाची रक्कम खूप मोठी होते. यासाठी रेल्वे प्रशासन चेकिंग स्टेशनचा आधार घेते.
हे आहेत चेकिंग स्टेशन
पुण्यात थांबणाऱ्या रेल्वेसाठी पुणे रेल्वे प्रशासनाने मुंबई, दौंड, मनमाड व कल्याण हे चेकिंग स्टेशन ठरविले आहे. जर पुणे स्टेशनवर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला. तर कारवाईवेळी जी गाडी फलाटावर आली अथवा आधीची पहिली गाडी लक्षात घेऊन त्याच्या चेकिंग स्टेशनचा आधार घेत कारवाई केली जाते.
महिन्यात २५ हजार प्रवासी
पुणे जानेवारी महिन्यात पुणे रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवास करणारे व विना प्लॅटफॉर्म तिकीट जवळपास २५ हजार प्रवासी आढळून आले. य दंडात्मक कारवाई करून १ कोटी ४२ लाख ५९ हजार २२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रोज एक हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
पुणे रेल्वेस्थानकावर रोज सरासरी २२२ प्रवासी गाड्यांची ये-जा आहे. यातून एक लाखाहून अधिक प्रवाशांची वाहतूक होत. मात्र त्या तुलनेत प्लॅटफॉर्म तिकिटाला खूप कमी प्रतिसाद लाभतो. आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये आहे, तर दररोज जवळपास एक हजार टफॉर्म तिकिटाची विक्री होत आहे.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या वा विनाप्लॅटफॉर्म तिकीट काढून स्थानकावर वावरणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही सातत्याने कारवाई करीत असतो. जानेवारी महिन्यात या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, यातून जवळपास दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग,