Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:07 PM2024-03-01T12:07:08+5:302024-03-01T12:07:32+5:30

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे....

Don't kill the waterfowl, use it! 'Mutha' covered with water leaf in Kharadi | Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

Pune: जलपर्णीला मारू नका, तिचा उपयोग करून घ्या! खराडीत जलपर्णीने झाकली ‘मुठा’

पुणे : जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. आता केमिकल टाकून तिला मारले जातेय; पण तिला मारल्याने परिस्थिती सुधारणार नाही. आपण पुणेकर डिटर्जंट प्रचंड वापरतो. त्या सांडपाण्याला संपूर्णपणे ‘ट्रीट’ केले जात नाही. ‘ट्रीट’ केले तरी आपण साफ काय करतो, तर फक्त ऑरगॉनिक. अमोनिया, नायट्रेट हे पाण्यात जातेच. त्यामुळे पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे जलपर्णी पाण्यात येते. मी स्वत: जलपर्णी वाढविण्याचा प्रयत्न केला हाेता. ती देखील स्वच्छ पाण्यात! पण पाण्याला प्रदूषित केले तरच ती वाढते, असे पर्यावरणीय शास्त्रज्ञ डॉ. अजित गोखले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

खराडीत सध्या मुठा नदीवर संपूर्ण जलपर्णी पसरलेली आहे. केवळ नदीच नव्हे तर कात्रज तलाव, पाषाण तलाव आणि जांभुळवाडी तलाव देखील जलपर्णीने भरून गेला आहे. खरं तर डास जलपर्णीने वाढत नाहीत, तर घाण पाण्यामुळे वाढतात. प्रदूषण सुरू झाले की डास येतात. जिथे जिथे जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. तिथे डास वाढले. डास वाढणं हे प्रदूषणाचे लक्षण आहे. या प्रदूषणाला आपणच जबाबदार आहोत.

शिवसधन संस्थेने १९८०-९०च्या दशकात सांगलीला एक प्रोजेक्ट केला होता. त्यात त्यांनी जलपर्णी वाढवली होती. त्या जलपर्णीपासून बायोगॅस बनवला होता. तो बायोगॅस वीस कुटुंबांना इंधन म्हणून दिला होता. बायोगॅस वापरून वीज निर्मिती केली होती. तो प्रकल्प बंद पाडला गेला. असे प्रकल्प कमी खर्चाचे असतात, ते फारसे आवडत नाहीत लोकांना.

बेंगलोरला एक कंपनी आहे. तीसुध्दा जलपर्णीपासून बायोगॅस बनवते. या जलपर्णीचे काय करायचे, त्याचे उचलून मलचिंग करायचे, बायोगॅस बनवायचा. वेस्टेजपासून एनर्जी बनवणे हा शहाणपणा आहे, असे गोखले यांनी नमूद केले.

केमिकल टाकणे अयोग्य !

‘ग्लायफोसेट’ हे तणनाशक आहे. याचा अर्थ काही प्रकारच्या वनस्पतींना हे तणनाशक मारते. जलपर्णी या तणनाशकामुळे मेल्यानंतर खाली बुडते. बुडलेली जलपर्णी कुजून त्याच्यावर आणखी डास वाढतात. आणखी प्रदूषण होते. त्यामुळे ग्लायफोसेट टाकू नये. पावसाळ्यात जलपर्णी नसते. तेव्हा पाणी डायलूट झालेले असते. जलपर्णी वाढू शकत नाही. पण पावसाळ्यानंतर प्रदूषण वाढते आणि जलपर्णी देखील वाढायला सुरुवात होते. एक तर प्रदूषण कमी करायला हवे आणि दुसरे पावसाळ्यानंतर नदीत जलपर्णी संपूर्ण काढावी. त्यामुळे ती वाढणार नाही, असे डॉ. गोखले म्हणाले.

‘एसटीपी’ बसविल्याने नायट्रेट आणि फॉस्फेट कमी होणार नाही. बीओडी, सीओडी कमी होते. एसटीपी ही अर्धी ट्रीटमेंट आहे. सांडपाणी शुध्द करून शेतावर, डोंगरावर पसरवले पाहिजे. त्यातील अन्न घेऊन वनस्पती वाढतील. वनस्पती आणखीन नवीन अन्न तयार करतील. अशा पध्दतीने सांडपाणी शुध्दीकरणाचे प्रयोग आम्ही इतर ठिकाणी केले आहेत.

- डॉ. अजित गोखले, पर्यावरणीय शास्त्रज्ञ

Web Title: Don't kill the waterfowl, use it! 'Mutha' covered with water leaf in Kharadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.