फुफ्फुसातला रोग डोक्यात जाऊ देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:48+5:302021-05-05T04:17:48+5:30
माजी सैनिक रमेश अंबुसकर : आत्मबळ, एकत्र कुटुंबाचा पाठिंबा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे कोरोनावर मात पुणे : लसीचा पहिला डोस ...
माजी सैनिक रमेश अंबुसकर : आत्मबळ, एकत्र कुटुंबाचा पाठिंबा आणि डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे कोरोनावर मात
पुणे : लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सैन्यातून निवृत्त झालेले ६७ वर्षीय रमेश अंबुसकर यांना ताप, अशक्तपणा, अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागली. लस घेतल्यामुळे त्रास होत असेल, असे समजून सुरुवातीला घरगुती औषधे सुरू होती. नंतर चाचणी केल्यावर कोरोनाचे निदान झाले. एचआरसीटी स्कोअर १७, फुफ्फुसांना ६० टक्के संसर्ग, रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास अशा परिस्थितीत रमेशजी ४ दिवस व्हेंटिलेटरवर तर ९ दिवस ऑक्सिजनवर होते. मात्र, आत्मबळ, पत्नी, सर्व सूना व मुलांचा पाठिंबा आणि डॉक्टरांचे प्रयत्न या जोरावर त्यांनी कोरोनाविरोधातील युद्ध जिंकले. आजही तब्येतीची चौकशी करणाऱ्या प्रत्येकाला रमेश अंबुसकर ''फुफ्फुसातला रोग डोक्यात जाऊ देऊ नका'', असाच सल्ला देतात.
रमेश अंबुसकर यांच्या सर्वात लहान मुलाचे २८ फेब्रुवारी रोजी लग्न होते. रमेशजींना ५ मार्चला त्यांना लसीचा पहिला डोस दिला. सुरुवातीला ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे दिसू लागली. दोन दिवसानी तोंडाची चव गेली, प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांनी त्यांची टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली.
रमेश अंबुसकर यांचा मुलगा तुषार अंबुसकर यांनी ''लोकमत''ला सांगितले, '' वडिलांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता, खोकलाही खूप वाढला होता. एचआरसीटी स्कोअर १६ असल्याचे निदान झाले. फुफ्फुसांना ६० टक्के संसर्ग झाला होता. वडिलांना आयसीयूमध्ये हलवले. तब्येत ढासळत चालल्याने आणि ऑक्सिजन पातळी खालावल्याने व्हेंटिलेटर लावला. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचाही त्रास होता.''
वडिलांना कोरोना झाल्याचे आम्ही त्यांना कळू दिले नाही. तुम्हाला न्युमोनिया झाला असून त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि औषधोपचार सुरू आहेत असे सांगितले, डॉक्टरांनाही तशीच विनंती केली. लहान भावाचा वडिलांवर फार जीव. त्यामुळे मी वडिलांबरोबर हॉस्पिटलमध्येच राहीन, असे त्याने ठरविले. डॉक्टरांना विनंती केल्यावर त्याला तिथे राहण्याची परवानगी मिळाली. आम्ही घरचे जेवण घेऊन जात होतो आणि मास्क, हॅन्डग्लोव्हज वापरून तो दररोज जेवू घालत होता. ते दिवस आमच्या सर्वांची परीक्षा पाहणारे होते. घरी आई, मोठा भाऊ आणि मोठी वहिनी यांनाही लक्षणे जाणवत असल्याने त्या तिघांनाही आयसोलेट केले. माझा मुलगा सव्वा वर्षाचा असल्याने त्याला काही त्रास होऊ नये म्हणून, माझ्या पत्नीचा आणि मुलालाही विलगीकरणात ठेवले. आठ दिवसांपूर्वीच लग्न होऊन आलेल्या नवीन नवरीने संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली. नवीन जोडप्याला लग्नानंतर लगेचच या संकटाचा सामना करावा लागला.
चौथ्या दिवशी वडिलांची प्रकृती सुधारू लागली. त्यांना व्हेंटिलेटरवरून ऑक्सिजनवर शिफ्ट केले. मला काहीही होणार नाही, असा आम्हालाच ते धीर देत होते. १४ दिवसांनी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने जीव भांड्यात पडला. वडिलांना डिस्चार्ज मिळाला. वडील घरी आल्यानंतर बँड वाजवून, हार घालून आम्ही त्यांचे स्वागत केले.