मास्क सक्ती नकोच, विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करा- आराेग्यमंत्री तानाजी सावंत
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 8, 2023 06:30 PM2023-04-08T18:30:01+5:302023-04-08T18:31:04+5:30
राज्यातील कोविडच्या वाढत्या संसर्गाबाबत आढावा घेण्यासाठी आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली...
पुणे : सातारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात नागरिकांना मास्क सक्ती केल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी मास्क सक्ती करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी सातारा यांना कळविण्यात यावे, अशा सूचना आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत दिल्या.
राज्यातील कोविडच्या वाढत्या संसर्गाबाबत आढावा घेण्यासाठी आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. राज्यातील कोविडच्या वाढत्या संसर्गाबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
विमानप्रवास करून राज्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्यातून कोविड, ‘एच१ एन१’, ‘एच ३, एन २’च्या वाढत्या संसर्गाबाबत दैनंदिन आकडेवारी प्रसिद्ध करण्यात यावी. या माहितीकरता जिल्हानिहाय प्रसिद्धी अधिकारी नेमण्यात यावा. राज्यात कोविड लसीकरण वाढविण्यात यावे; तसेच तिसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
याचबराेबर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये कोविड प्रिकॉशन डोसेस उपलब्ध करून देण्यात यावा. काेरोना कालावधीतील कोविड रुग्णालयातील सर्व साधने यांची उपलब्धता; तसेच ते कार्यरत स्थितीत असण्याबाबत खात्री करण्यात यावी. केंद्र शासनाकडून जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट प्राप्त होण्यास जास्त दिवसांचा कालावधी लागत आहे. तरी सदर रिपोर्ट ५ दिवसांच्या आत राज्य आरोग्य विभागास प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. कोविडची लागण झालेलया रुग्णाच्या नातेवाईक यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभगाचे सचिव-२ नवीन सोना, आयुक्त धीरज कुमार, संचालक मुंबई डॉ. स्वनील लाळे, सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, तसेच टास्क फोर्समधील डॉ. सुभाष साळुंखे उपस्थित होते.