राजगडाचा सिंहगड करु नका! राजगडावरील 'रोप वे'ला तीव्र विरोध,पुण्यात शिवप्रेमी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:18 PM2021-06-15T20:18:11+5:302021-06-15T20:19:34+5:30
राजगडावरील रोप वेसाठी विरोध करून शिवप्रेमी संघटनांनी वेळप्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे...
मार्गासनी: छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजगडावर हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. राजगड ही अतिशय पवित्र ऐतिहासिक वास्तू असून तिचे पावित्र्य रोपवे मुळे धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजगडाचा सिंहगड करु नका. त्याचवेळी राजगडाच्या 'रोप वे'साठी आमचा विरोध असून प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याचे सांगत पुण्यात शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. प्रतिष्ठान,राष्ट्रसेवा समुह,दुर्गरक्षक संघटना,आदी संघटनानी केली आहे.
याबाबत शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम,राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे बारामावळ परिसराचे अध्यक्ष सचिन खोपडे,दुर्गरक्षक प्रतिष्ठानचे पप्पु लिपाणे, विकास साळुंखे आदींनी पत्रकार परिषदेत शिवप्रेमी संघटनांची भूमिका स्पष्ट केली.
शिवप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड आजही मोठ्या दिमाखात इतिहासांची साक्ष देत आहे. मात्र, राजगडावर रोप वेसाठी मंजुरी मिळाली आहे. या रोपवेला स्थानिकासह आमचा देखील तीव्र विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना दऱ्या- खोऱ्यातून गेल्याशिवाय इतिहासातील पराक्रम, मोहिमा समजणार कशा ? तसेच किल्ले राजगडावर रोप वे झाल्यास पर्यटन स्थळ म्हणून त्याचा वापर केला जाईल. त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजगडासारखी ऐतिहासिक वास्तू रोप वेमुळे नष्ट करु नका, या राजगडाच्या रोप वेसाठी आमचा विरोध असून प्रसंगी तीव्र स्वरुपाचे आंदोलन देखील करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
...
राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असुन रोप वेमुळे या वास्तुचे पावित्र्य धोक्यात येणार आहे. ते आम्ही होऊ देणार नाही
- महेश कदम, अध्यक्ष शिवशंभु प्रतिष्ठान, कात्रज.
.....
राजगडावर रोप वे झाल्यास किल्ल्यावर हौशी पर्यटक जाऊन किल्ल्यावर अनैतिक गोष्टी सुरु होतील त्यामुळे आमचा
रोप वेसाठी विरोध आहे.
- राहुल पोकळे, अध्यक्ष, राष्ट्रसेवा समुह, धायरी.