पुण्यात आता पुन्हा लॉकडाऊन नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:23+5:302021-04-02T04:12:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी एका दिवसात आठ हजार रुग्णांचा टप्पा कधीच ओलांडला असून, पुणे पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे हॉटस्पाॅट ठरले आहे. यामुळेच शुक्रवार (दि. २) रोजी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार लॉकडाऊनसंदर्भात काय निर्णय जाहीर करणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी. रुग्ण संख्या कमी न झाल्यास २ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असा अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारची बैठक महत्त्वाची आहे.
या बैठकीत पुणे, पिंपरी, चिंचवडसह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, वैद्यकीय व्यवस्था यांचा आढावा घेतला जाणार आहे. मृत्यू दर किती, सध्या रुग्णालयांची स्थिती काय, कोरोना लसीकरण यांचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात दोनशे कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, असे स्पष्ट मत पुणेकरांनी सातत्याने व्यक्त केले आहे. गेल्या वर्षभरातली सातत्याच्या टाळेबंदीमुळे आणि निर्बंधांमुळे व्यापारउदीम, आर्थिक व्यवहार, उद्योगधंदा या सर्वांवर विपरीत परीणाम झाला आहे. हातावर पोट असलेल्यांची स्थिती अवघड बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन काय करणार, अजित पवार काय निर्णय घेणार याकडे पुण्याचे लक्ष लागले आहे.