यंदाची आषाढी पालखी सोहळा नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:09 AM2021-05-28T04:09:21+5:302021-05-28T04:09:21+5:30
आळंदी : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती ही ...
आळंदी : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती ही भयंकर व भीतिदायक आहे. फलटण शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यूसुद्धा झालेले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता यंदासुद्धा आषाढी वारीचा पालखी सोहळा हा पायी नसावा असा अभिप्राय फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्राद्वारे पाठवलेली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे ? याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने पालखी मार्गावरील गावांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. त्यानुसार फलटण नगरपालिकेस १६ मे रोजी पाठवलेले पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्रानुसार फलटण नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला फलटण शहरासह परिसरातील कोरोनाची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती जर आहे अशीच राहिली तर पायीवारी करणे हे ग्रामस्थ, भाविक व वारकरी यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे एसटीतूनच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणे योग्य राहील. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता फलटण शहरात एकही वारकरी येणे योग्य व सुरक्षित वाटत नाही. ज्या वेळेस कोरोनाची परिस्थिती सुधारेल त्या वेळेसच पायी पालखी सोहळ्याबाबत मत व्यक्त करणे हे उचित ठरेल, असेही पत्रात स्पष्ट केले आहे.
याबाबत देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर म्हणाले, शुक्रवारी (दि.२८) वारीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व वारी संबंधित विश्वस्तांची बैठक आहे. यंदा पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे होणाऱ्या बैठकीत वारी आयोजित करावी, अशी मागणी केली जाणार आहे. प्रशासन काय निर्णय घेईल त्यानुसार पुढील धोरण निश्चित केले जाईल.