मोबाईलचा अतीवापर नको पण उपवासही नकोच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:06+5:302021-04-03T04:11:06+5:30
चिमुरड्यांपासून तर थोरांपर्यंत आजकाल सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतोच. सकाळच उजाडते ती मोबाइलमध्ये सेट केलेल्या आवडीच्या आलार्म गाण्याच्या गजराने..आणि लॉकडाऊनच्या ...
चिमुरड्यांपासून तर थोरांपर्यंत आजकाल सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतोच. सकाळच उजाडते ती मोबाइलमध्ये सेट केलेल्या आवडीच्या आलार्म गाण्याच्या गजराने..आणि लॉकडाऊनच्या काळातही मित्रांना गप्पाटप्पा मारता आल्या त्या मोबाईलमधील विविध ॲप्स व व्हिडीओ कॉलींमुळे. अगदी लहान मुलाला घास भरवतांना देखील पूर्वी आई गोष्ट सांगायची.. गाणी म्हणायची परंतु आजकाल चक्क आजीसुद्धा मोबाइलवर गाणी किंवा कार्टून लावून चिमुरड्यांना घास भरवतात. हल्ली चिऊ काऊ हे झाडावर न दिसता मोबाइलमध्येच दिसतात. आणि बघा ना हे चिमुरडेही मोबाइलवर गाणी लागताच किती पटकन घास घेतात,किती नवल ना...
तरुण मंडळी तर काय मोबाईल ही जणूकाही संजीवानीच मानतात. थोडावेळ मोबाईल बंद झाला किंवा चार्जिंग संपलं तर त्यांचा जीव नुसता कासावीस होतो. तो पूर्ववत सुरु झाला कि त्यांच्या जीवात जीव येतो .. खरंय ना..अहो एवढंच काय या शाळांचंच बघा ना!!हल्ली या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे पूर्वी ज्या शिक्षिका विद्यार्थ्यांना मोबाईल बाहेर ठेऊन किंवा बंद करून यायला सांगायच्या त्याच आता मोबाईल बंद केला तर ऑनलाईन तासाला वर्गात घेत नाहीत.
अहो एवढंच काय तर हल्लीच्या आज्या देखील देवघरात संध्याकाळी दिवा लावल्यावर शुभंकरोतती व श्लोक देखील मोबाइलवरच निवांत ऐकतात.
शाळेतील व कॉलेज मधील विद्यार्थी अभ्यास करायलादेखील पुस्तक हातात न घेता मोबाइलवर चक्क धडे ऐकतात. एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही तर डिकशनरीच्या ऐवजी मोबाईल गुगल वरच अर्थही शोधतात... खरंच मोबाइलमुळे हल्लीची पिढी स्मार्ट जरी झाली असेल तरी शेवटी काय तर स्वामी तिन्ही जगाचा मोबाइलविना भिकारी असे म्हणायची वेळ येऊ नये यासाठी मोबाइलचा अतिरिक्त वापर टाळणे महत्वाचे!!
मोबाइलमुळे सर्व घरबसल्या ऑर्डर देऊन बोलावता येते, परदेशातील लोकांचा सहज संपर्क साधता येतो असे बरेच मोबाइलचे फायदे देखील आहेतच, परंतु कुठलीही गोष्ट मापात असेल तरच ती फायद्याची असते. मोबाइलचा वापर महत्वाच्या ठिकाणी केला तर मोबाईल निश्चितीच एक वरदान आहे, पण त्याचप्रमाणे मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे निश्चितच माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यवर परिणाम होऊ शकतो. परंतु मोबाइलचा वापर अगदी गरजूपुरताच केला तर खरच मोबाईल हा एक उत्तम संपर्काचे व माहितीचे उत्तम साधन आहे. विचार करा तर मित्रांनो मोबाईल हे एक साधन म्हणून वापरायचे की एक व्यसन म्हणून.
निर्मल पंडित
मुख्याध्यापिका -पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल.. सुस ब्रांच*