घाबरू नका काळजी घ्या! डॉक्टरांसह, पदाधिकाऱ्यांचा कोरोना रुग्णांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:37 PM2021-04-16T19:37:43+5:302021-04-16T19:38:17+5:30
एका दिवसांत सहा हजारांहून अधिक नागरिकांच्या तपासणीत आढळले फक्त १८ कोरोनाबाधित रुग्ण
सांगवी : सांगवी येथे जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून २१६ नागरिकांच्या अँटीजन तपासणीत आज १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यावेळी नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. त्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर भितीपूर्वक वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या मनातील भिती घालवून ते लवकरात लवकर बरे होऊन घरी परतावे यासाठी सांगवीतील डॉक्टरांसह, पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना दिलासा देऊन योग्य उपचार घेण्याचे आवाहन केले.
जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने व जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या सहकार्याने वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावांमुळे गावात सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान सांगवी, खांडज, शिरवली,माळवाडी,या गावातील नागरिकांनी देखील अँटीजन तपासणी करून घेतली. ज्या व्यक्तींना ताप,सर्दी,खोकला,कणकणी, अंगदुःखी, दम लागणे, तोंडाला चव न येणे, नाकाला वास न येणे इत्यादी समस्या असणाऱ्या नागरिकांसह दुकानदारांची जिल्हा परिषद शाळेत अँटीजन तपासणी करण्यात आली. तसेच इतर संशय वाटणाऱ्या नागरिकांना देखील तपासणी करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर घरोघरी जाऊन नागरिकांची डिजिटल थर्मामिटरच्या साह्याने शरीरातील तापमान, पल्स ऑक्सिमीटरच्या सह्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. तर गावातील सर्व दुकानदारांना अँटीजन तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, जे दुकानदार तपासणी करणार नाही त्यांना विक्रीस परवानगी नाकारण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतने जाहीर केले आहे.
सांगवीत काल पर्यंत दोनशेच्या आसपास कोरोना रुग्णांची संख्या झाली होती.आता पर्यंत २१ कोरोना रुग्ण सक्रिय असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आजच्या २१६ जणांच्या तपासणीत सांगवीतील १२ रुग्ण माळवाडीतील २ रुग्ण, कांबळेश्वरमधील ३ रुग्ण खांडजमधील १ रुग्ण असे एकुण १८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १८ पैकी सांगवीतील १२ रुग्ण आहेत. तर सांगवीत आता पर्यंतचा आकडा २१० झाला आहे. आजपर्यंत ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.