घाबरू नका उपचार घ्या! ‘H3 N2’ या नव्या विषाणूने फुप्फुसाला संसर्ग किंवा न्यूमाेनिया हाेत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 02:25 PM2023-03-12T14:25:07+5:302023-03-12T14:25:19+5:30

नव्या विषाणूचा आणि काेराेनाचा काही संबंध नसून काेराेनात जी काळजी घ्यावी लागते, ती घ्यावी, असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे

Don't panic, get treatment! The new virus 'H3 N2' does not cause lung infection or pneumonia | घाबरू नका उपचार घ्या! ‘H3 N2’ या नव्या विषाणूने फुप्फुसाला संसर्ग किंवा न्यूमाेनिया हाेत नाही

घाबरू नका उपचार घ्या! ‘H3 N2’ या नव्या विषाणूने फुप्फुसाला संसर्ग किंवा न्यूमाेनिया हाेत नाही

googlenewsNext

पुणे: सध्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ‘एच ३ एन २’ हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजेच श्वसन यंत्रणेच्या वरील भागातील अवयवांना (नाक, घसा) संसर्ग करणारा विषाणू आहे. ताे काेराेनासारखा ‘लाेवर रेस्पिरेटरी ट्रॅक’ म्हणजे श्वसन यंत्रणेच्या खालच्या भागातील अवयवांना (फुप्फुस, न्युमाेनियासदृश) हाेणारा संसर्ग नाही. त्यामुळे ताे घातक नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणांनुसार उपचार घ्यावेत, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

सध्या वातावरण बदलामुळे ‘एच ३ एन २’ या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. हा सिझनल फ्लू आहे. खासकरून ‘एन्फ्लुएन्झा ए’ प्रवर्गातील हा व्हायरस आहे. जेव्हा पावसाळा संपताे व हिवाळा सुरू हाेताे, हिवाळा संपताे व उन्हाळा लागताे, तसेच उन्हाळा संपताना आणि पावसाळा सुरू हाेताना या विषाणूंची संख्या वाढते व त्याचे रुग्ण दिसून येतात. परंतु, त्यांची संख्या यावर्षी जास्त वाढलेली आहे. प्रत्येक घरात किमान एकतरी रुग्ण आहे. त्यामुळे नागरिक या आजाराने बेहाल झालेले पाहायला मिळत आहेत.

काय आहे एच ३ एन २ विषाणू ?

हा एक सर्वत्र आढळणाऱ्या एन्फ्लुएन्झा व्हायरसचा ‘एच ३ एन २’ हा उपप्रकार आहे. वातावरण बदलाच्या काळात श्वसन यंत्रणेशी निगडित हा विषाणू असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटलेले आहे. सन १९६८ मध्ये पहिल्यांदा त्याचा शोध वैद्यकशास्त्राला लागला. तसेच या विषाणूला ‘एन्फ्लुएन्झा ए’चा विषाणू म्हणूनही ओळखले जाते. कारण एन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा हा उपप्रकार आहे.

कसे हाेते निदान?

या विषाणूच्या संसर्गानंतर दाेन ते तीन आठवडे खोकला जात नाही. रक्त नमुन्यांसह काही अन्य तपासण्या केल्यावर ‘एच ३ एच २’ची लागण झाली आहे की नाही ते कळू शकते.

काय आहेत लक्षणे?

- तीन ते पाच दिवस ताप राहताे.
- दाेन ते तीन आठवडे काेरडा खाेकला राहताे.
- थंडी वाजते, धाप लागते, घसा खवखवताे.
- साेबतच मळमळ, उलटी ही लक्षणेदेखील राहतात.

कसा हाेताे प्रसार?

हा आजार किंवा विषाणू संसर्गजन्य आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातून तसेच हवेतून त्याचा प्रसार हाेताे. बाधित व्यक्तीच्या खाेकला, शिंकांमधून त्याचा प्रसार हाेताे.

ही काळजी घ्या!

- मास्क घाला, गर्दीत जाऊ नका, बाहेर स्पर्श करू नका.
- सॅनिटायझरचा उपयाेग करा.
- आजारी व्यक्तींपासून दूर राहा.
- आजारी पडल्यास डाॅक्टरांना दाखवून उपचार घ्या.

प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लहान मुलांना व ज्येष्ठांना याची लागण

‘एच३ एन२’ हा ‘एन्फ्लुएन्झा ए’ प्रकारातील विषाणू असून, ताे आधीच आपल्यामध्ये आहे. त्यामध्ये म्युटेशन हाेत आहेत. पूर्वीही याचे रुग्ण आपल्यामध्ये हाेते, फक्त आता जिनाेम सिक्वेन्सिंग हाेत असल्याने त्याचे निदान हाेत आहे. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लहान मुलांना व ज्येष्ठांना याची लागण हाेत आहे. तसेच, जे काेराेना काळात एक्सपाेज झालेले नाही, त्या तरुणांना लागण हाेत असावी. याचा व काेराेनाचा संबंध नाही. मात्र, काेराेनात जी काळजी घ्यावी लागते, ती घ्यावी, असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांना ॲन्टिबायाेटिक्स म्हणजे प्रतिजैविके देऊन उपयाेग हाेत नाही म्हणून ती देऊ नयेत. डाॅक्टरांनी रुग्णांना पाहून त्यानुसार औषधाेपचार करायला हवेत. - डाॅ. नानासाहेब थाेरात, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड

फुप्फुसाला संसर्ग किंवा न्यूमाेनिया हाेत नाही

हा नेहमीचा विषाणू असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ताे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचा विषाणू असल्याने घातक नाही. त्यामुळे फुप्फुसाला संसर्ग किंवा न्यूमाेनिया हाेत नाही. आपण नायडू हाॅस्पिटलमध्ये संशयितांचे नमुने घेत असून, ते एनआयव्हीकडे तपासणी करण्यासाठी पाठवत आहाेत. मात्र, त्यापैकी एकाही रुग्णाला अजून ‘एच३ एन२’ हा व्हायरस आढळून आलेला नाही. आजारी पडल्यास नागरिकांनी जवळच्या सरकारी दवाखान्यांत दाखवून घ्यावे. - डाॅ. सूर्यकांत देवकर, साथराेग अधिकारी, पुणे मनपा

Web Title: Don't panic, get treatment! The new virus 'H3 N2' does not cause lung infection or pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.