घाबरू नका; लगेच रुग्णालयात दाखल व्हायची घाई कशाला ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:09 AM2021-04-18T04:09:54+5:302021-04-18T04:09:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोनाची नागरिकांमध्ये इतकी दहशत बसली आहे की ‘आला ताप की न्या रुग्णालयात’ असा प्रकार सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोनाची नागरिकांमध्ये इतकी दहशत बसली आहे की ‘आला ताप की न्या रुग्णालयात’ असा प्रकार सुरू आहे. कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांनी मात्र अशी घाई करण्याची गरज नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले आहे. कारण घरी राहूनही बरे होता येत आहे.
काही साध्या गोष्टींचा विचार केला तरी रुग्णाला बरोबर घेऊन करावी लागणारी धावपळ टाळता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे हे खरेच आहे, पण म्हणूनच सर्व नागरिकांनी त्याबाबत जागरूक झाले पाहिजे, त्याची प्राथमिक माहितीही करून घेतली पाहिजे, असे बहुतांश डॉक्टरांना वाटते.
सध्या रुग्णसंख्या वाढल्याने शहरातील सर्व रुग्णालयांवर ताण आला आहे, खाटा शिल्लक नाहीत, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड नाहीत अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गरजू रुग्णांना जागा नसल्याने त्यांना जीवाला मुकावे लागत आहे. काही गोष्टी विचारपूर्वक केल्या, तर यात बदल होऊ शकतो, आशादायक स्थिती निर्माण होऊ शकते, असे या वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले,
* काय लक्षणे जाणवत आहेत त्याचा बारकाईने विचार करा. प्रत्येक ताप, सर्दी, खोकला कोरोनाच असतो असे नाही. म्हणूनच लक्षणे नीट पाहा.
* रुग्णालयात आता दाखल व्हायलाच हवे असा निर्णय स्वतःच किंवा घरातल्यांनीही लगेच घेऊ नये.
त्याची लक्षणे तीव्र स्वरूपाची व त्रास देणारी असतात.
* फॅमिली डॉक्टरांना दाखवा, ते सांगतील ते ऐका.
* घरात पल्समीटर, ऑक्सिमीटर ही दोन साधने ठेवा. ती कशी वापरायची याची माहिती करून घ्या.
* रुग्णाचा पल्स रेट, ऑक्सिजन लेवल याची रोजच्या रोज आपल्या डॉक्टरांना व्हॉट्सअॅप किंवा कोणत्याही साधनाने माहिती द्या.
* लक्षणीय फरक जाणवला तर त्याबाबत त्वरित डॉक्टरांना कळवा व त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या.
---///
साथरोग तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले,
* घाबरून जाऊ नका. कोरोनाच्या १०० रुग्णांपैकी फक्त १० जणांना रूग्णालयात दाखल होण्याची गरज असते हे लक्षात ठेवा
* आपण त्या १० मधले आहोत का याचा पुढील मुद्द्यांवर विचार करा.
* वय ६०-७० च्या पुढे, धाप लागत असेल, थकवा जाणवत असेल, छातीत फार कफ झाला असेल, सतत ताप येऊन अंग दुखत असेल तर आणि तरच दाखल व्हायची गरज असते.
* यापैकी काहीच नसेल तर तुम्ही घरातून बाहेरही न पडता कोरोनातून बरे होऊ शकता.
* घरी राहून औषधे, वेळेवर घ्यायची, तब्येतीमधील चढ उतारांवर वारंवार लक्ष ठेवण्याची गरज असते. स्वतः ही लक्ष ठेवा व घरातील व्यक्तींना ही कल्पना द्या.
----//