पुणे : पे अँड पार्क नकोच, अवाजवी शुल्काचीच होतेय आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 02:20 PM2022-05-13T14:20:42+5:302022-05-13T14:23:17+5:30
शुल्कावर नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत...
पुणे : शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पे अँड पार्कच्या ठेकेदारांकडून पार्किंग शुल्क पावतीवर एक व आकारले जाते जास्त, हा नित्याचा अनुभव आहे. तसाच प्रकार यापुढे पुणे शहरात रस्त्यांवरील पे अँड पार्कबाबत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही रस्त्यावर पे अँड पार्क धोरण न राबविता प्रथम महापालिकेची वाहनतळ विकसित करावीत. तसेच येथील शुल्कावर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून पे अँड पार्क धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याने, यापूर्वीच महापालिकेची वाहनतळे चालविण्यास दिलेल्या ठेकेदारांकडून थकबाकी वसूल करताना महापालिकेच्या नाकीनऊ आले आहे. सध्या शहरातील विविध वाहनतळ ठेकेदारांकडून ५ कोटी ६५ लाख ७९ हजार ७५६ रुपये थकबाकी असून, ही थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधित ठेकेदाराच्या मिळकतींवर बोजा चढवण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधितांच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात दावे दाखल केले जाणार आहेत.
महापालिकेच्या प्रकल्प विभागाने मंडईतील कै. सतीशशेठ मिसाळ वाहनतळ, लक्ष्मी रस्त्यावरील हमालवाडा वाहनतळ चारचाकी व दुचाकी, मंडईतील आर्यन वाहनतळ आणि पुणे स्टेशन येथील तुकारामशेठ शिंदे वाहनतळ (दुचाकी) ही वाहनतळे प्रशासनाकडून ताब्यात घेतली आहेत. ही वाहनतळे महापालिका स्वत: चालवित असून, येथे पावतीवरील छापील शुल्काप्रमाणेच शुल्क आकारणी करण्यात येत असल्याचे पालिकेने सांगितले आहे. दरम्यान, अन्य वाहनतळांवर कुठे छापील शुल्कापेक्षा जास्त पैशाची मागणी करण्यात येत असेल, तर नागरिकांनी पालिकेकडे तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. जेथे पार्किंग शुल्कापेक्षा अधिकची मागणी होत आहे, त्यांच्याबाबत तक्रार आल्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
बेवारस वाहनतळे पैसे घेणारेही वेगळे
महापालिकेची आठ वाहनतळे आज काेणीही चालवत नसून, येथे मनमानी पद्धतीने नागरिक गाड्या पार्क करत आहेत. परंतु, यापैकी काही ठिकाणी वाहन पार्क करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत. पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्ती महापालिकेच्या अथवा खासगी ठेकेदाराच्याही नाहीत.