बिनकामाचे वाजवू नका वाहनांचे भोंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:55+5:302020-12-13T04:26:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार...ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका...एकत्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एक, दोन, तीन, चार नो हॉर्न बार बार...ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका...एकत्र येऊ ध्वनी प्रदूषण कमी करु...स्वच्छ पुणे शांत पुणे पण कधी, आपण सर्वजण ‘नो हॉकींग’ची शिस्त लावू आधी...नका वाजवू हॉर्न तब्येत राहील छान... अशा घोषणा देत पुणेकरांनी ‘नो हॉकींग डे’ (हॉर्न न वाजवण्याचा दिवस) अर्थात ‘नो हॉर्न डे’ हा जनजागृती कार्यक्रम शनिवारी (दि. १२) टिळक चौकात घेण्यात आला.
लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस (वाहतूक विभाग) यांच्या वतीने ‘एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती’ हा उपक्रम राबवण्यात आला. पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, प्रा.पद्माकर पुंडे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दिलीप हल्याळ, पोपटलाल शिंगवी, प्रमोद ढेपे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्रीरामे म्हणाले की, पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची संख्या आहे. साधारणत: दररोज एककोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. कर्कश हॉर्न वाजवल्यावर कारवाई केली जाते. दंडही आकाराला जातो. त्यापेक्षा लोकांनी स्वतःहून हॉर्न वाजवणे बंद केले पाहिजे. अगदीच गरज असेल तर ठीक पण एरवी हॉर्न वाजवूच नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पाठक म्हणाले, “वाढत्या ध्वनिप्रदूषणात वाहनांच्या हॉर्नचा आवाज हे मुख्य कारण आहे. पुणेकरांना उच्च रक्तदाब, ह्रद् यरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचा देखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी ‘नो हॉर्न’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवली पाहिजे.” लोकांच्या मेंदूला हॉर्न वाजवण्याची सवय झाली आहे. शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी ‘नो हॉर्न’ विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही, अशी खंत टिल्लू यांनी व्यक्त केली.