भवितव्य अंधारात ढकलू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:09 AM2021-05-27T04:09:37+5:302021-05-27T04:09:37+5:30

राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच न्यायालयाने ...

Don’t push the future into darkness | भवितव्य अंधारात ढकलू नका

भवितव्य अंधारात ढकलू नका

Next

राज्य शासनाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये या निर्णयावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच न्यायालयाने शासनाच्या या निर्णयाबाबत जे अभिप्राय नोंदवले ते पाहता दहावी परीक्षेबाबत उच्च न्यायालय किती संवदेनशील आहे, याची प्रचिती येते.

---------------------

इयत्ता दहावीची परीक्षा ही अवघ्या शालेय जीवनाची आणि शैक्षणिक भवितव्याची फलश्रुती मानली जाते. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि समाज या परीक्षेबाबत कमालीचा अधीर असतो. समर्थ आणि सक्षमपणे जीवनाची इमारतच या पायावर उभी केली जाते. आपला पाल्य दहावीपर्यंत शिकत आला ही घटनाही पालकांना गौरवशाली वाटते. अवघा समाज दहावी आणि बारावी परीक्षेबाबत तीव्र संवेदनशील असतो. दहावीच्या परीक्षेतील गुणांची संपादणूक त्यांच्या भवितव्याला सुयोग्य दिशा देतात, अशी पालकांची दृढ धारणा असते. उच्च न्यायालयानेही पालक शिक्षक आणि विद्यार्थी मनात असलेली सजग संवदेनाच जणू प्रकट केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

उच्च न्यायालयाने व्यक्त केलेले अभिप्राय शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजाने अक्षरश: सन्मानाने स्वीकारले आहेत. त्यांनाही आपल्याच भावना न्यायदेवतेच्या मुखातून प्रकट झाल्याचे श्रेय साध्य झाल्याचे समाधान प्राप्त झाले आहे. विश्वाच्या शैक्षणिक इतिहासात परीक्षेविना उत्तीर्ण करण्याचा असा प्रकार प्रथमच अनुभवायला मिळतो आहे, म्हणून हे सारे पचायला अवघड जात आहे. न्यायालयाने इयत्ता बारावीची परीक्षा जर तुम्ही घेऊ शकता तर दहावीची का नाही? असा साधा सरळ तर्काधारीत प्रश्न विचारला आहे. राज्य शासनाने कोरोना प्रकोपामुळे हा निर्णय घेतला आहे. शेवटी विद्यार्थ्यांचे जीवन परीक्षेपेक्षा महत्त्वाचे आहे. ही शासनभावना निर्णयापाठीमागे आहे, हे जरी खरे असले तरी आपली मूल्यांकन प्रणाली हा निर्णय घेण्यापूर्वी तयार असायला हवी होती. ती तयार नव्हती. हे मान्य करायला हवे.

दहावीची परीक्षा जशी विद्यार्थ्यांना अविरत अभ्यासाला प्रेरणा देते तशी शिक्षकांनाही कठोर परिश्रम आणि निरंतर अध्यापनास बाध्य करते. तीच रद्द झाल्यास सारी यंत्रणाच निष्क्रीय होण्याचा धोका आहे. ‘राज्य शासनाचा हा धोरणात्मक निर्णय असला तरी धोरणकर्त्यांच्या इच्छेनुसार असे विचित्र निर्णय घेतले जाऊ नयेत. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत, त्यांना परीक्षेविना वारंवार उत्तीर्ण करून त्यांचे भवितव्य अंधारात ढकलू नका, असेही न्यायालयाने नमूद केलेले असून ही गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे.

परीक्षा ही विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रेरणा देणारी चिरंतन, अक्षय ऊर्जा असते, हे मात्र सत्य आहे. दहाव्या वर्गात प्रवेश घेतला रे घेतला की अवघे विद्यार्थी विश्व अभ्यासाला लागते. वेळापत्रक तयार होते. आई-बाप आपल्या पाल्यासाठी दीर्घ रजा घेऊन त्याला मदत करतात. प्रेरणा, प्रोत्साहन देतात. इयत्ता नववीपर्यंत नऊ वर्षांत झाला नसेल एवढा अभ्यास दहावीच्या एका वर्षात पूर्ण केला जातो. मग दहावीपासून या कठोर परिश्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आलेली परिपक्वता पुढे अधिकाधिक सजग आणि संवेदनशील होत जाते.

एकदा दहावी परीक्षेच्या लखलखीत यशाचा देदीप्यमान प्रकाश प्रकाशित झाला की पुढे विद्यार्थी आपल्या भवितव्याला आकार द्यायला सक्षम होतो. ध्येयाकडील त्याची अविरत वाटचाल प्रशस्त होत जाते. ‘लक्ष्य तक पहुंच बिना पथ में पथिक विश्राम कैसा?’ हा विचार विद्यार्थी मनात सक्षमपणे रुजतो, तो दहावीच्या परीक्षेमुळेच! दहावीला त्याने प्राप्त केलेल्या गुणांचे रूपांतर सद्गुणांमध्ये होते आणि त्याच्या भवितव्याचा मार्ग प्रशस्त होतो. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज मनातील दहावीच्या परीक्षेबाबतची ही निरागस भावना मानसशास्त्र, शिक्षण शास्त्राच्या कसोटीवर खरी उतरो अथवा न उतरो पण हेच सत्य आणि वास्तव आहे. या वास्तवाला छेद देण्याचा प्रयत्न कोरोना प्रकोपानंतर तरी थांबावा एवढीच अपेक्षा करता येईल.

डॉ. गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य

Web Title: Don’t push the future into darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.