पाेलिसांना काही दिवस बक्षीस देऊ नका! पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:43 AM2022-10-14T09:43:41+5:302022-10-14T09:44:47+5:30
पोलीस उपायुक्तांनी मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची खैरात केली हाेती...
पुणे : पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचा (रिवॉर्ड) मुद्दा टीकेचा झाल्यानंतर गुरुवारी झालेल्या डब्ल्यूआरएम बैठकीत (गुन्हे आढावा बैठक) संबंधित अधिकाऱ्यांना पुढील काही दिवस कोणीही बक्षीस देऊ नये, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केली. घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.
पोलीस उपायुक्तांनी मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर बक्षिसांची खैरात केली हाेती, त्याचवेळी दुसरीकडे चांगली कामगिरी करणाऱ्या पथकांची तुटपुंज्या बक्षिसांवर बोळवण केली हाेती. त्याची शहर पोलीस दलात मोठी चर्चा होऊन त्यावर टीका झाली होती.
प्रत्येक पोलीस आयुक्तालयाला रिवॉर्ड देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येतो. शासनाच्या बक्षीस मंजूर करण्याच्या नियमावलीनुसार पोलीस उपायुक्त ३५ हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचे अधिकार आहेत. मात्र अनेकदा पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दुपटीहून अधिक बक्षिसे देत असल्याचे दिसून येते.