Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना ससूनला पाठवू नका; इतर सरकारी रुग्णालयात पाठवा, ससून प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 03:13 PM2024-08-06T15:13:57+5:302024-08-06T15:14:40+5:30

बेवारस पेशंटसाेबत काेणी नसल्याने त्यांच्या स्वच्छतेपासून सर्व काही ससूनमधील कर्मचाऱ्यांना करावे लागते, ताण येणाऱ्या मनुष्यबळाकडे प्रशासन लक्ष देईल का?

Don't send destitute patients to Sassoon Send to other government hospitals urges Sassoon administration | Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना ससूनला पाठवू नका; इतर सरकारी रुग्णालयात पाठवा, ससून प्रशासनाचे आवाहन

Sasoon Hospital: बेवारस रुग्णांना ससूनला पाठवू नका; इतर सरकारी रुग्णालयात पाठवा, ससून प्रशासनाचे आवाहन

पुणे : ससून रुग्णालय हे टर्शरी केअर रुग्णालय आहे. येथे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आणि गुंतागुंतीच्या रुग्णांवर उपचार हाेणे अपेक्षित आहे. तसेच जे उपचार इतर सरकारी रुग्णालयांतही हाेतात ते रुग्ण येथे आणणे अपेक्षित नाही. त्यापैकीच काही बेवारस पेशंटही असतात ज्यांना किरकाेळ दुखापतींमुळे ससून रुग्णालयात आणले जाते. अशा रुग्णांना थेट ससूनमध्ये न आणता जवळच्या सरकारी रुग्णालयांत देखील उपचार करण्यात यावेत, असे आवाहन ससून रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

ससून रुग्णालयातून नुकतेच एका बेवारस रुग्णाला मनाेरुग्णालयाच्या समाेर साेडून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले हाेते. त्यामुळे रुग्णालयावर टीका झाली. मात्र, रुग्णालयाच्याही काही बाजू आहेत त्या देखील समजून घेणे आवश्यक आहे. अजूनही रुग्णालयात असे ४८ रुग्ण आहेत. त्यांचा भार येथील वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यावर पडत आहे. हे सर्व ओझे ससूनवर पडत आहे. परंतु, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचा उपचार सार्वजनिक आराेग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महापालिकेच्या सर्वसामान्य रुग्णालयांत आणि पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम हाॅस्पिटलमध्ये हाेणे शक्य आहे. मात्र, सर्वच रुग्ण बेधडकपणे ससूनमध्ये पाठविले जातात. त्यामुळे येथे पेशंटची संख्या वाढते.

बेवारस पेशंट ससूनला पाठविण्याची सवय वर्षानुवर्षे पाेलिसांसह डायल १०८ यांनाही लागलेली आहे. तशीच ती इतर शासकीय रुग्णालयांमधील डाॅक्टरांनाही लागलेली आहे. पिंपरी-चिंचवड हे देखील महापालिकेचे माेठे रुग्णालय आहे. येथे बेवारस रुग्णांचा उपचार हाेऊ शकताे. परंतु, वायसीएमसारखे रुग्णालय देखील बेवारस पेशंटला दाखल न करता थेट ससूनला पाठवून देते. जिल्हा रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे आम्ही किती भार सहन करायचा असा प्रश्न ससून रुग्णालयाकडून विचारला जात आहे.

मनुष्यबळाची कमतरता

या बेवारस पेशंटसाेबत काेणी नसल्याने, तसेच त्यांना जर चालता येत नसल्यास त्यांचे कपडे बदलण्यापासून वैयक्तिक स्वच्छतेसाठी मदत करण्याचे काम ससून रुग्णालयातील कर्मचारी करत असतात. एकतर येथे प्रत्येक वाॅर्डामध्ये ६० ते ७० रुग्णांमागे एक ते दाेनच परिचारिका असतात आणि एक ते दाेन सेवक असतात. ही संख्या खूप कमी आहे. त्यामुळे येथील मनुष्यबळावर ताण येताे, याकडे शासन, तसेच इतर लक्ष घालतील का असा, प्रश्न रुग्णालयाकडून विचारला जात आहे.

बेवारस रुग्ण इतर सरकारी रुग्णालयांत घेऊन गेल्यास आणि त्यांनी ते घेतल्यास ससून रुग्णालयावरील बेवारस रुग्णांचा ५० टक्के ताण कमी हाेईल. त्यामुळे येथील जे बेवारस रुग्ण आहेत, त्यांचीही सेवा याेग्य प्रकारे करता येईल. याबाबत इतर रुग्णालयांसाेबत पत्रव्यवहार करण्यात येईल, तसेच वरिष्ठ पाेलिसांसाेबतही चर्चा करण्यात येणार आहे. -डाॅ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

Web Title: Don't send destitute patients to Sassoon Send to other government hospitals urges Sassoon administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.