लॉकडाऊन करून आम्हाला उपाशी मारू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:09 AM2021-04-05T04:09:32+5:302021-04-05T04:09:32+5:30
(१) गेले वर्षभर कोरोना, लाॅकडाऊन व वर्क फ्राॅम होम मुळे लोकांचा दुचाकी वापर खूप कमी झाला होता. त्याचा परिणाम ...
(१) गेले वर्षभर कोरोना, लाॅकडाऊन व वर्क फ्राॅम होम मुळे लोकांचा दुचाकी वापर खूप कमी झाला होता. त्याचा परिणाम आमच्या दुचाकी दुरुस्ती व्यवसायावर झालाच होता. परंतु कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने
शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. मागील वर्ष कसे तरी पार पडले. आता कुठे व्यवसाय उभारी घेत होता. परंतु लाॅकडाऊनच्या भीतीमुळे व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. लाॅकडाऊनऐवजी कोरोना प्रतिबंधक नियमावलीची कठोर अंमलबजावणी केली तरी चालेल, परंतु आता लाॅकडाऊन नकोच.
- गिरीश सोपान चव्हाण, दुचाकी मकॅनिक
(२)
आज पूर्वीच्या निम्माही व्यवसाय राहिलेला नाही. आता जर लोक लाॅकडाऊनमुळे फळे खरेदीसाठी बाहेर पडले नाहीत तर आमचा व्यवसाय कसा चालणार? प्रपंच कसा चालणार? आमचं हातावरचं पोट आहे. तसेच आमचा फळे हा माल नाशवंत स्वरूपाचा आहे. ग्राहकच जर येणार नसतील तर आमचं फळे खरेदी-विक्रीचे आर्थिक गणित कसे जुळणार? पुन्हा लाॅकडाऊन लावू नका, आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या पोटावर पाय देऊ नका.
- दत्ता कदम, फळविक्रेता, बालाजीनगर.
(३)
संभाजीनगर परिसरात आमचे झेराॅक्सचे व सायबर कॅफे आहे. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आमच्या दुकानातून झेराॅक्स काढतात, तर विद्यार्थीवर्ग पुस्तके व अन्य स्टडी मटेरियलच्या झेराॅक्स आमच्याकडे काढतात. परंतु लाॅकडाऊनमुळे शाळा- काॅलेजेस बंद असल्याने त्याचा परिणाम झेराॅक्स व्यवसायावर झाला होता. त्यातच लाॅकडाऊनमुळे दुकान लवकर बंद करावे लागत असल्याने सायबर कॅफेच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. शासनाने लाॅकडाऊन करू नये, हीच अपेक्षा.
- हेमंत डावलकर, झेराॅक्स व्यावसायिक, संभाजीनगर.
(४)
मी एक तरुण व्यावसायिक असून माझा साऊंड सिस्टीमचा व्यवसाय आहे. वडील अकाली वारल्याने मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अन्य पर्याय नसल्याने मी या व्यवसायात उतरलो. निर्बंधामुळे गणेशोत्सव, शिवजयंती अशासारखे अनेक सण वाया गेले. त्यातच साऊंड सिस्टीम व्यवसायाला अगोदरच वेळेचे बंधन पाळावे लागत होते, कोरोना व लाॅकडाऊनमुळे लग्नकार्य व अन्य कार्यक्रम कमी झाल्याने व्यवसाय कमी झाला होता. आता जर शासनाने पुन्हा निर्बंध आणि पुन्हा लाॅकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण केली तर व्यवसाय कायमचाच बंद करावा लागेल.
- सिद्धार्थ हिंगसे, साऊंड सिस्टीम व्यावसायिक, बालाजीनगर.
--------------------------------