GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:17 IST2025-02-28T17:16:29+5:302025-02-28T17:17:42+5:30
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी महापालिकेच्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का?

GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी
पुणे : गुलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांना उपचाराच्या खर्चासाठी महापालिकेकडून दिली जाणारी आर्थिक मदत थांबवू नये, अशी मागणी महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी केली आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडगाव, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व या भागात मागील महिन्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले होते. महापालिकेकडून या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत २ लाख तर इतर रुग्णांना १ लाखाची मदत देण्यात येत होती. मात्र, या साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले आहे. त्यामुळे नवीन बाधित रुग्ण आठवड्यात एखादा सापडतो. याशिवाय या आजाराचे रुग्ण वर्षभर सापडत असल्याने सर्वांनाच मदत देणे शक्य नाही, त्यामुळे असल्याने उपचारासाठीची दिली जाणारी आर्थिक मदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ मार्चपासून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे.
या आजाराचा साथीचा समूळ नायनाट झाला आहे का? याबाबत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी तसेच केंद्र सरकारच्या महामारीच्या विभागाशी आपल्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का ? आम्ही घेतलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या कुठल्याही सूचना अथवा आदेश आपण ना राज्य सरकारला विचारले ना राज्य सरकारकडून आपल्याकडे कळवले गेले. त्यामुळे आर्थिक मदत बंद करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.