जम्बो अन् वाद काय थांबेच ना! आयसीयूतील काही डॉक्टरांनी मांडले थेट अजित पवारांकडे गाऱ्हाणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 02:57 PM2021-03-29T14:57:37+5:302021-03-29T14:58:51+5:30
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने तयार करण्यात आलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले आहे
पुणे : कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी अतिजलद गतीने व गाजावाजा करत तयार करण्यात आलेले जम्बो रुग्णालय पहिल्या दिवसापासून वादात सापडले आहे. जणू जम्बो आणि वाद हे समीकरणच तयार झाले आहे. आताही जम्बो सुरू होऊन आठ दिवस उलटत नाही तोच नवा वाद उफाळून आला आहे. व यासंबंधी अतिदक्षता विभागातील ४ डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी थेट बारामती गाठली.
मात्र, त्यांची भेट न झाल्यामुळे पत्राद्वारे तक्रारींचा पाढाच वाचला असून काही मागण्या देखील केल्या आहेत.
राज्यात कोरोना संकट गडद होत आहे.पुण्यात दिवसागणिक वाढत आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासन, पुणेकर अशा सर्वांचीच धाबे दणाणले आहे.त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेले जम्बो पुन्हा एकदा सुरू करण्यात आले. मात्र जम्बोतील ४ डॉक्टरांनी थेट उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे जम्बोतील सध्याच्या वैद्यकीय सुविधांमधील त्रुटींविषयी पत्राद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे.
डॉक्टर पत्रात म्हणतात, कोविडची आताची लाट पहिल्या पेक्षाही फार भयंकर आहे. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांना अतिदक्षता विभागातील बेड्स उपलब्ध होण्यात खूप अडचणी येत आहे. तसेच पुन्हा सुरू करण्यात आलेले जम्बो झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या सेवेत कमी पडत आहे. त्यात भर म्हणजे अतिदक्षता विभागात अननुभवी डॉक्टरांची भरती करण्यात आली असून तेथील मृत्युदर वाढला आहे.मात्र, अशा परिस्थितीत पहिले ५ महिने इथे कामाचा अनुभव असलेल्या डॉक्टरांची पुन्हा भरती करण्यात यावी. मात्र पहिल्या ५ महिने काम केलेल्या डॉक्टरांचे पगार थकीत आहे. त्यामुळे तिथे डॉक्टर आणि नरसिंग स्टाफ काम करण्यास तयार नाही. परंतू, आता आयसीयू मध्ये पुन्हा जुन्या डॉक्टरांची भरती करून त्यांचे वेतन थेट महापालिकेद्वारे करण्यात यावे असाही उल्लेख पत्रात अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी केला आहे.
या संदर्भात जम्बो प्रशासनाशी संपर्क साधला असता अधिष्ठाता (डीन ) डॉ. श्रीयांश कपाले म्हणाले, सर्व लोकांचे पगार करण्यात आले आहेत. काही संस्था वगळता सर्वांची बिल देखील देण्यात आली आहेत. या पत्रात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पत्रावरची सही देखील संशयास्पद वाटत आहे. पगारावरुन चर्चा केली जात असतेच. सध्या जम्बो मध्ये ५०० रुग्णांने पुरेसा होईल इतका स्टाफ आहे. या जम्बोला बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत आहे. जम्बो कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाशी कोणीही याबाबत संपर्क साधलेला नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत आम्ही पोलिस तक्रार करत आहेत. तसेच तपास देखील करण्यात येईल.