पोलिसांनो; पोलिसिंग करा टिक टॉक व्हिडिओ नको..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:45 PM2020-03-25T16:45:32+5:302020-03-25T17:31:51+5:30

लाठीचार्ज करताना केले जाते टिक टॉक

Don't Tick Talk Video only Do Policing | पोलिसांनो; पोलिसिंग करा टिक टॉक व्हिडिओ नको..

पोलिसांनो; पोलिसिंग करा टिक टॉक व्हिडिओ नको..

Next
ठळक मुद्देपरिस्थिती चिघळू नये याची काळजी घेण्याची गरज कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरात केली वाहतूक बंदी

पुणे : शहरात सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. रस्त्यांवर शुकशुकाट आहे. सगळीकडे शांततापूर्ण वातावरण आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पोलीस हटकून घरी जाण्यास सांगत आहेत. जे ऐकत नाहीत त्यांना लाठीचा प्रसाद मिळत आहे. असे असताना काही पोलीस नागरिकांना फटकवत असतानाचे व्हिडिओ तयार करत आहेत. इतकेच नव्हे तर त्याचे टिक टॉक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. 
कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने पोलीस प्रशासनाने शहरात वाहतूक बंदी केली. यामुळे सगळीकडे रस्ते ओस पडले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर जो दिसेल त्याला घरी पाठवण्यात येत आहे. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र चुकून कुणी महत्वाच्या कामाकरिता घराबाहेर पडल्यास त्याला फटके मारण्यास पोलीस मागेपुढं पाहत नाहीत. ते एवढ्यावर थांबत नाहीत तर त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत आहेत. अनेकांनी वाहतुकदाराना लाठीचार्ज करताना टिक टॉक व्हिडिओ बनवून ते आपल्या फेसबुक व व्हाट्सअप अकाऊंटवर शेयर केले आहेत. वास्तविक पोलीस आणि राज्य प्रशासन यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व नागरिक शांतपणे आदेशाचे पालन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडिओ तयार करून ते शेयर करणे कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांडून विचारला जात आहे. 
सध्या वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुपवर पोलिसांच्या अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यावर अनेकांनी पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले आहे. नागरिकांना समज देण्याकरिता काही वेळा अशा प्रकारची कृती करावी लागते. असे मेसेज पाठवून पोलिसांची पाठराखण केली असली तरीदेखील ज्याला मारहाण केली जात आहे त्याचा व्हिडीओ तयार करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. 
शहरातील सध्याच्या पोलिसिंग बद्दल पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. मिलींद पवार म्हणाले, संचारबंदीचे नियोजन करणे पोलिसांचे काम आहे. जे ऐकत नाहीत त्यांच्यावर दहशत बसविण्यासाठी काही प्रमाणात लाठीचार्ज योग्य आहे. मात्र त्याचा अतिरेक नको. याचे कारण म्हणजे सध्या जनता भयभीत झाली आहे. सगळेजण घरात बसून आहे. प्रत्येकाच्या समस्या आहेत. त्यातून आणखी वेगळे काही व्हायला नको. पोलिसांनी फ्री हँड दिल्याप्रमाणे वागता कामा नये. पोलिसांनी व्हिडिओ काढू नये. टिक टॉक तर अजिबात करू नये. अशाने समाजात वेगळा मेसेज जाऊ नये. याची काळजी पोलिसांनी घ्यावी.

..........

पुढच्यास ठेच मागचा शहाणा.... 
नागरिकांमध्ये अद्याप स्वयंशिस्तीचा अभाव दिसून येतो. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जे व्हिडिओ व्हायरल होतात त्यातून समाज प्रबोधन होते असे मला वाटते. हा सगळा प्रकार म्हणजे पुढच्यास ठेच मागचा शहाना असे म्हणावे लागेल. मात्र यासगळ्या प्रकारचा अतिरेक नको. मारहाण करण्यापेक्षा समजुतीने घ्यावे. थोड्या फार प्रमाणात भीती दाखवण्यासाठी लाठीचार्ज ठीक आहे. आता अनेकांना किराणा घेण्यासाठी तसेच, मेडिकल मध्ये इमर्जन्सी जावे लागते अशावेळी पोलिसांना आपले कारण नागरिकांना पटवून देता यायला हवे. 
- अरविंद पाटील (माजी एसीपी अधिकारी )

Web Title: Don't Tick Talk Video only Do Policing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.