लबाड आणि फसव्या माणसांसाठी काम करायचं नाही; हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:30 PM2019-09-04T15:30:58+5:302019-09-04T15:31:46+5:30
पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला.
इंदापूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकून जात असताना आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेत राष्ट्रवादीकडून होणाऱ्या अन्यायावर जोरदार भाष्य केलं.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापुरात शिवस्वराज्य यात्रा नियोजित नसताना अचानक यात्रा कशी आली? 23 एप्रिलला निवडणुकीचा निकाल लागला असताना आज 4 सप्टेंबर तारीख उजाडली तरी इंदापूरची जागा सोडण्याबाबत एकही वरिष्ठ नेता बोलत नाही. पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादीकडून नेहमी अन्याय करण्यात आला. सभ्यपणाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेण्यात आला असा आरोप त्यांनी केला.
तसेच लबाड, फसवणूक करणाऱ्या माणसांसाठी काम करायचं नाही. आघाडीची बैठक झाली जुन्नरची जागा सुटली तर इंदापुरची जागा का सुटली नाही? त्यामुळे आता निष्ठावान आणि प्रामाणिक माणसांसाठी काम करायचं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून येत्या काही दिवसांत आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे असा संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना सांगितले की, साडेचार पाच वर्षात आपण सत्तेत नव्हतो. कुठल्या पदावर नव्हतो तरीही विधानभवन मंत्रालयात गेलो, तर मुख्यमंत्र्यांनी कधी आपल्याला कोणत्या कामासाठी नाही म्हटलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उभं राहण्याची ऑफर दिली होती. मात्र आघाडी असल्याने मी नकार दिला. तरीही मुख्यमंत्र्यांनी मनात राग ठेवला नाही. पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित राहण्यासाठी कॅबिनेट मिटींगच्या वेळेत बदल करून घेतले. दिलेला शब्द पाळणारी एका बाजूला आणि ज्यांच्यासाठी काम केलं ती एका बाजूला अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. तत्पूर्वी इंदापुरातील कार्यकर्त्याच्या मेळाव्यापूर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांची शिवरत्न बंगल्यावर भेट घेतली असल्याने त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जातं आहे.