बिनधास्त विचारा शंका मासिक पाळीविषयी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:51+5:302021-05-29T04:08:51+5:30

समाजबंधचा पुढाकार : अभिव्यक्ती, शंका निरसन, वैद्यकीय मार्गदर्शन यासाठी मोफत हेल्पलाईन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जागतिक मासिक पाळी ...

Don't worry about menstruation! | बिनधास्त विचारा शंका मासिक पाळीविषयी!

बिनधास्त विचारा शंका मासिक पाळीविषयी!

Next

समाजबंधचा पुढाकार : अभिव्यक्ती, शंका निरसन, वैद्यकीय मार्गदर्शन यासाठी मोफत हेल्पलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन दिन २८ मे रोजी साजरा केला जातो. यानिमित्त समाजबंध संस्थेतर्फे ‘मासिका टॉक लाईन’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात येत आहे. मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करणारी ही मराठीतील पहिलीच हेल्पलाईन ठरली आहे.

अगदी दहा-बारा वर्षांच्या मुलीपासून ते ८९ वर्षांच्या आजीपर्यंत सर्वाना मासिक पाळीविषयी व्यक्त व्हायचे असते, आपला अनुभव, मत कोणालातरी सांगायचे असते, प्रश्न विचारायचे असतात, शंकांचे निरसन करून घ्यायचे असते. मात्र समजून घेणारी, हक्काची जागा त्यांना मिळत नाही. त्यामुळे या टॉकलाईनमध्ये पाळीविषयी व्यक्त होणे, पाळीविषयी माहिती मिळवणे आणि प्राथमिक वैद्यकीय सल्ला मिळवणे, अशा तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

समाजबंधने २८ मे निमित्त महिनाभर (२८ एप्रिल ते २८ मे) ''पिरियड रिव्हॉल्यूशन २०२१'' हे अभियान राबवले. ‘मासिक पाळीस पूरक समाज निर्मितीसाठी’ हे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. या अभियानांतर्गत पाळीविषयी जास्तीत जास्त बोलले, लिहिले, ऐकले व वाचले जावे; जेणेकरून याविषयी समाजात असणारी लज्जा, अस्पृश्यता, गैरसमज नाहीसे होतील यासाठी या विषयाला धरून पत्रलेखन, कविता लेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला, मुलाखत, पोस्टर बनवणे, अनुभव कथन अशा अनेक स्पर्धा ऑनलाईन आयोजित केल्या गेल्या, ज्यात जवळपास हजार लोकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रभरातून साडे तीनशेच्यावर सक्रिय कार्यकर्ते या अभियानात महिनाभर सामील झाले होते.

------

टॉक लाईन कशी काम करेल ?

टॉक लाईनसाठी ७७०९४८८२८६ हा क्रमांक समाजबंधने जाहीर केला असून, वरील तिन्हीपैकी कोणत्याही सुविधेसाठी कोणत्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुषही फोन करू शकतात. ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य असल्याने कोणीही याचा लाभ घेऊ शकते. फोन उचलल्यानंतर आपल्याला तिन्हीपैकी कोणत्या कारणासाठी फोन केला आहे हे सांगावे लागेल. आलेल्या फोनला उत्तर देण्यासाठी फक्त शांतपणे ऐकून घेणारे, या विषयावर मार्गदर्शन करू शकणारे आणि या विषयातील तज्ञ डॉक्टर्स अशा तीन स्वतंत्र टीम बनवल्या आहेत. फोनकर्त्याच्या मागणीनुसार त्या टीममधील जी व्यक्ती त्या वेळी बोलण्यासाठी उपलब्ध आहे, त्या व्यक्तीसोबत त्यांना जोडून दिले जाईल. अशाप्रकारे एकूण ३० कार्यकर्ते या टॉकलाईन साठी कायम उपलब्ध असतील. शिवाय या विषयावर अधिक माहिती देणारे लेख, व्हिडीओ, लघुपट समाजबंधने एकत्र केले आहेत. तेही फोनकर्त्यांना पाठवले जातील, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात अजून भर पडेल.

चौकट

मुली, तरुणी, महिला त्यांचे मत, अनुभव व म्हणणे त्या इथे बिनधास्तपणे मांडू शकतील. समाजबंधचे कार्यकर्ते त्यांना व्यवस्थित ऐकून घेतील. दुसरी सुविधा म्हणजे मार्गदर्शन. कोणाचे काही प्रश्न, शंका असतील किंवा काही माहिती हवी असेल तर त्यांना मार्गदर्शन मिळेल. तिसरी महत्वाची सुविधा म्हणजे कोणाला पाळीशी निगडित कोणत्याही आजारासंदर्भात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांशी सल्ला मसलत करायची असेल, प्राथमिक सल्ला व मदत हवी असेल तर त्यांना डॉक्टरांशी जोडून दिले जाईल. ग्रामीण भागात स्त्रीरोगतज्ञांची ‌उणीव असल्याने योग्य निदान व उपचार न मिळत नाहीत. परिणामी महिलांचे आजार बळावतात. यासाठी प्राथमिक टप्यातच योग्य सल्ला व दिशा मिळणे खूप महत्त्वाचे असते.

- शर्वरी सुरेखा अरुण, सचिन आशा सुभाष

Web Title: Don't worry about menstruation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.