'तुम्ही चिंता करू नका...' तो निरोप अखेरचा ठरला अन् काळाने घाला घातला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:45 PM2023-04-16T14:45:09+5:302023-04-16T15:06:53+5:30
आयोजकांनी पथकातील सदस्यांना थांबण्याचा आग्रह केला होता, पण त्यांनी ऐकले नाही
नारायण बडगुजर
पिंपरी : सर्वत्र उत्सवाचा जल्लोष त्यात चार तास चाललेल्या मिरवणुकीत मुंबई येथील पथकाने ढोल-ताशाच्या जोरदार वादनामुळे रंगत आणली. जयघोष करून आणि ढोल-ताशा वाजवून दमलेल्या पथकातील प्रत्येकाने पोटभर जेवण केले. त्यानंतर मुक्कामासाठी त्यांना आयोजकांकडून आग्रह करण्यात आला, मात्र, पथकातील सदस्यांनी मुक्कामाला नकार दिला. रात्री दाेनला मुंबईच्या दिशेने पथक निघाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. खोपोली येथे बस दरीत कोसळून अपघात झाला अन् होत्याचे नव्हते ते झाले...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सव मंडळातर्फे शुक्रवारी सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी मुंबई येथील ढोल-ताशा पथकाला बोलावण्यात आले होते. या पथकात ४० सदस्य होते. यात आठ वर्षांच्या एका चिमुकल्यासह पाच महिला देखील होत्या. शुक्रवारी सायंकाळी पथक पिंपळे गुरव येथे दाखल झाले. मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक पुढे सरकू लागली अन् ताशाचा कडकडाट होऊन जयषोघ व जल्लोष करण्यात आला. आठ वर्षांचा चिमुकला व महिलांनी ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पथकाच्या या वादनामुळे पिंपळे गुरववासीसांचे मन त्यांनी जिंकले.
पिंपळे गुरव येथे सुदर्शननगर ते सृष्टी चौका दरम्यान निघालेल्या या मिरवणुकीचा रात्री साडेअकराच्या सुमारास समारोप झाला. त्यानंतर ढोल-ताशा पथकातील सर्वांनी जेवण केले. तसेच आवराआवर करून निघायला लागले. त्यावेळी आयोजकांनी त्यांना थांबण्याचा आग्रह केला. बुद्ध विहारामध्ये तुम्हाला रात्रभर थांबता येईल, आता खूप उशीर झाला आहे, नका जाऊत, तुम्ही सकाळी लवकर निघू शकता, असे मंडळाचे कार्यकर्ते आदित्य राऊत यांनी सांगितले. मात्र, पथकातील सदस्यांनी थांबण्यास नकार दिला. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही थांबत नसतो. आम्हाला रात्री उशिरा प्रवासाची सवय आहे. यापेक्षाही लांबच्या ठिकाणी जाऊन आम्ही रात्री परतलो आहोत. मुंबईला दोन ते तीन तासात पोहचता येते. त्यामुळे आम्ही लगेचच पोहचू, तुम्ही चिंता करू नका, असे म्हणत ढोल-ताशा पथकाने रात्री दोनच्या सुमारास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा निरोप घेतला. या पथकातील मृत सदस्यांसाठी हा निरोप अखेरचा ठरला अन् चिंता करून नका हे वाक्य चटका लावून गेले, असे आयोजकांनी सांगितले.