दरवाजा उघडला, कपाळाला बंदूक अन् गोळी झाडली; खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 09:14 AM2023-10-30T09:14:38+5:302023-10-30T09:37:18+5:30
काही समजण्याच्या आतच गोळ्या झाडून घरातील एका व्यक्तीचा खून झाला
किरण शिंदे
पुणे : मध्यरात्रीचे दोन वाजलेले.. घरातले सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक कुणीतरी दरवाजा वाजवतो. घरातील एक जण उठून दरवाजा उघडतो. समोर अनोळखी व्यक्ती असतो. काही समजण्याच्या आतच तो गोळ्या झाडून घरातील एका व्यक्तीचा खून करतो. हा संपूर्ण प्रकार घडलाय पुण्यातील घोरपडे पेठेत. अनिल रामदेव साहू (वय 35) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खडक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहू यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
साहू कुटुंबीय मूळचे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातले. मात्र कामानिमित्त ते पुण्यात आले आणि पुण्यातील घोरपडी पेठेत राहू लागले. घोरपडे पेठेतील सुवर्णभारत मित्र मंडळा जवळील श्रीकृष्ण हाइट्स या इमारतीत ते राहत होते. रविवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक त्यांचा दरवाजा वाजला. फिर्यादी घुरनकुमार जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता समोर एक अनोळखी व्यक्ती उभा होता. त्याने फिर्यादीला "तेरा भाई किधर है, उसको बुला असे सांगितले". त्यानंतर फिर्यादींनी किचनमध्ये हेडफोन लावून बसलेल्या अनिल साहू यांना बाहेर आलेल्या व्यक्तीविषयी सांगितले. अनिल साहू बाहेर गेले आणि त्या व्यक्तीसोबत बोलत होते.
बोलत असताना अनोळखी व्यक्तीने फिर्यादींच्या चुलत भावाला काहीतरी विचारले. त्यावर अनिल साहू यांनी मान हलवून नकार दिला. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली आणि त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या एका दुचाकीवर अज्ञात साथीदारांसह पळून गेला. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.