सावित्रींच्या लेकींसाठी खानवडीत उभारणार वस्तीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:01+5:302021-02-05T05:00:01+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्या सावित्रीबाईंनी देशात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, त्याच सावित्रीबाईंच्या खानवडीत (ता. ...
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्या सावित्रीबाईंनी देशात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, त्याच सावित्रीबाईंच्या खानवडीत (ता. पुरंदर) आता त्यांच्या उपेक्षित, वंचित लेकींसाठी निवासी शाळा उभारली जाणार आहे. या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकातील तसेच विविध लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित मुलींनाही शिक्षणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणासाठी लढा उभारला. यासाठी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. त्या सहन करत त्यांनी स्त्रियांना आणि मुलींना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. मात्र, याच त्यांच्या लेकींना आज अनेक कारणांनी शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा शिक्षणापासून वंचित राहावे लागते. पैसे नसल्याने इच्छा असतानाही मुलींना शिक्षण घेता येत नाही. तर मुलगी आहे शिकून काय करणार आहे, अशा विचाराने मुलींना शिकवले जात नाही. तसेच लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलींचे शिक्षणही अर्धवट होते. अशा मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासठी गुरुकुल पद्धतीप्रमाणे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खानवडी गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात ही निवासी शाळा उभारण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, या प्रकल्पाचे सादरीकरण नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर करण्यात आले होते. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. सीएसआर फंड आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून ही शाळा उभारली जाणार आहे. सुरुवातीला ९० मुलींना या शाळेत भरती करण्याचे उद्दिष्ट आहे. तर २०२५ पर्यंत ५०० मुलींना या शाळेत प्रवेश देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
चौकट
१०ते १२ एकर परिसरात उभी राहणार शाळा
मुलींच्या या निवासी शाळेसाठी जागा खानवडी येथे निश्चित करण्यात आली आहे. जवळपास १० ते१२ एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. याचे दोन भाग असणार आहे. पहिल्या भागात वसतिगृह तर दुसऱ्या भागात शाळा बांधली जाणार आहे. यात सर्व आधुनिक सुविधा दिल्या जाणार आहे.
चौकट
उपेक्षित घटकातील मुलींना प्रोत्साहन
जिल्ह्यातील उपेक्षित घटकांतील मुलींना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच लैगिंक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना बाहेर काढून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. महाराष्ट्रात २.९ टक्के मधेच शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण आहे. तर लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलींचे प्रमाण १८ टक्के आहे. त्यात पुणे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोट
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुलींना त्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. खानवडी येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून, यामुळे खऱ्या अर्थाने दुर्लक्षित, उपेक्षित घटकातील मुलींना त्यांचे हक्काचे शिक्षण मिळणार आहे.
रणजित शिवतरे, उपाध्यक्ष