डीजेला दिला फाटा : लग्नमंडपात घुमला मृदंगाचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 02:17 AM2019-01-07T02:17:02+5:302019-01-07T02:17:22+5:30
डीजेला दिला फाटा : मुळशी परिसरात अनोखा उपक्रम
भूगाव : मुळशीतील एका लग्नात डीजे लावण्याऐवजी मृदंगाचा आवाज घुमल्याने हा एक अनोखा मुळशी पॅटर्न पाहावयास मिळाला. लग्नात मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टीमला फाटा देत लग्नाची मिरवणूक चक्क टाळ- मृदंगाच्या गजरात काढली गेली. भूगावमधील दुर्वांकूर मंगल कार्यालयात वर्षा रवींद्र माझिरे व वैभव विलास दुडे यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यात माऊली नादब्रह्म मृदंग वर्गाचे पन्नास मृदंग व तीस टाळकऱ्यांनी पारंपरिक भजन म्हणत नवरा-नवरीची मिरवणूक काढली. या वेळी संपूर्ण मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
वधू वर्षा, तर वर वैभव हा तालुक्यात भजन, कीर्तनात अनेक ठिकाणी सुमधुर मृदंग वाजवत प्रेक्षकांची मने जिंकतात. हभप विठ्ठल गव्हाणे, सोमनाथ साठे, ऋषिकेश चव्हाण, वैभव माझिरे, सागर बधे यांच्या कल्पनेतून ही मिरवणूक साकारली गेली. अनेक लग्नांत डीजे मिरवणुकींवर होणाºया लाखो रुपयांच्या खर्चाला फाटा देत अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून वधू-वराने लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. याचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे.