एसी यंत्रांच्या किमतीत ग्राहकांची दुहेरी लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:22 AM2019-07-26T11:22:39+5:302019-07-26T11:23:09+5:30

शहरामध्ये विविध प्रकारच्या एकाच उत्पादनांची दोन वेगवेगळ्या किमतींना विक्री करण्यात येत आहे. बऱ्याचदा त्याचा फसव्या सवलती देण्यासाठी देखील वापर केला जातो.

Double loot of customers at the cost of AC equipment | एसी यंत्रांच्या किमतीत ग्राहकांची दुहेरी लूट

एसी यंत्रांच्या किमतीत ग्राहकांची दुहेरी लूट

Next
ठळक मुद्दे ग्राहकांची फसवणूक : कंपनीच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार

विशाल शिर्के- 
पुणे : चहापाठोपाठ चक्क वातानुकूलित यंत्रणा (एसी) देखील दुहेरी किमतीला विकली जात असल्याचे उघड झाले आहे. पुणे जिल्हा वैधमापन विभागाने डायकीन या प्रसिद्ध कंपनीची सुमारे प्रत्येकी सव्वादोन लाख रुपयांची दोन्ही एसी यंत्र जप्त केली आहेत. तसेच, संबंधित कंपनीच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. 
शहरामध्ये विविध प्रकारच्या एकाच उत्पादनांची दोन वेगवेगळ्या किमतींना विक्री करण्यात येत आहे. बऱ्याचदा त्याचा फसव्या सवलती देण्यासाठी देखील वापर केला जातो असे, ग्राहक संघटनांचे मत आहे. गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने चहाच्या कंपनीची फसवेगिरी समोर आणली होती. ‘ग्राहकराजाची फसवणूक’ या मथळ्याखाली २१ जून रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर वैधमापन विभागाने संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली होती. तसेच, या वृत्तानंतर राज्यात एकाच उत्पादनाची दुहेरी किमतीला विक्री करण्यात येत नाही ना, हे शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वैधमापन विभागाचे राज्याचे अतिरिक्त महासंचालक संदीप बिश्नोई यांच्या सूचनेनुसार जिल्हा वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक एन. पी. उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गिरीश वाघमारे यांच्या पथकाने तपासणी केली. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली येथील नेवासकर लॉजिस्टिक्सच्या तपासणीत प्रसिद्ध डायकीन एसी कंपनीचे एकाच प्रकारचे उत्पादन दुहेरी किमतीला विकण्यात येत असल्याचे समोर आले आहे. 
 एकाच पद्धतीचे उत्पादन दोन वेगवेगळ्या किमतींना विकता येत नाही. एकाच वस्तूची दोन किमतीने विक्री केल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकाला प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची कायद्यात तरतूद आहे. दुसºयांदा असा प्रकार घडल्यास संबंधित कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालविला जातो. संबंधितांवर वैधमापन कायदा २००९च्या पॅकेज कमोडीटी रुल २०११ नुसार कारवाई करण्यात येते.  
याबाबत माहिती देताना वजन मापे विभागाचे अधिकारी उदमले म्हणाले, एकाच उत्पादनाची दुहेरी किमतीला विक्री होत असल्याबाबत शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत डायकीन कंपनीच्या एकाच प्रकारच्या एसीची किंमत वेगवेगळी असल्याचे आढळले. एका एसीवर २ लाख १८ हजार ७०० आणि दुसºया एसीवर २ लाख ३७ हजार २०० रुपये एमआरपी होती. दोन्ही एसी जप्त करण्यात आले आहेत. 
..........
सरकारने एमआरपी कायदा बदलायला हवा. प्रत्येक उत्पादकाला उत्पादनाची किंमत आणि एमआरपी अशा दोन्ही किमती नोंदविणे बंधनकारक करायला हवे. त्यामुळे उत्पादनाची किंमत, त्यावरील कर अशी माहिती आपोआपच समजेल. कंपन्यांकडून करण्यात येणाºया फसवेगिरीला आळा बसेल. अशा प्रवृत्तींवर केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांनी विक्री केलेले युनिटही माघारी बोलावले पाहिजे. त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. - विजय सागर, अध्यक्ष, 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे
जिल्हा वजनमापे विभागाने राबविलेल्या मोहिमेत एसीच्या एकाच उत्पादनाची किंमत वेगवेगळी आढळून आली. दोन्ही एसी जप्त करण्यात आले आहेत. कंपनी आणि कंपनीच्या सर्व संचालकांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव वजन मापे विभागाच्या उपनियंत्रकांकडे पाठविण्यात येईल. ही तपासणी मोहीम या पुढेदेखील चालूच राहील. - एन. पी. उदमले, सहायक नियंत्रक, 
वैधमापन विभाग पुणे जिल्हा

Web Title: Double loot of customers at the cost of AC equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.