डाळभात दिल्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड, आरोपीस पुण्यातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:15 AM2020-06-07T05:15:21+5:302020-06-07T05:16:00+5:30
आरोपीस पुण्यातून अटक । व्यवस्थापक बाहेरून मागवायचा चांगले जेवण
मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका बारमधील दोघा कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. बारचा व्यवस्थापक चांगले जेवण मागवून खात असे व आरोपीस मात्र डाळभात द्यायचा. यावरून भांडण होऊन मारहाण केल्याच्या रागातून त्याने दोघांची झोपतच हत्या केल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे .
मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी बारमध्ये राहणारा बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी (४८) व सफाईकामगार नरेश पंडित (५२) यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारच्या पाण्याच्या टाकीत टाकले. गुरुवारी बारमालक गंगाधर पय्याडे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हत्याकांड उघड झाले. बार लॉकडाऊन काळात बंद असल्याने शेट्टी, पंडित सह कल्लू राजू यादव (३५) असे तिघेच बारमध्ये रहात होते. यादव हा बारमध्ये नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी तपास सुरु केला. मीरा रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मिळून शोधमोहीम हाती घेतली व त्यासाठी काही पथके तयार केली.
तांत्रिक विश्लेषणच्या आधारे पोलीस पथकाने कल्लू याला शुक्र वारी रात्री पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील साजन बारमधून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत कल्लू याने ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना व्यवस्थापक शेट्टी हा अन्य हॉटेलमधून चांगले जेवण मागवून खात असे. परंतु कल्लूला डाळभातच देत असे. या भांडणातूनच शेट्टी व पंडितने कल्लूला मारहाण केली होती.
यापूर्वीही गुन्हे दाखल
भांडणाचा राग आल्याने सूड घेण्यासाठी कल्लूने १ जून रोजी रात्री शेट्टी व पंडित झोपलेले असताना फावड्याने वार करून हत्या केली . त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिले व तो पसार झाला. दोघांचे मोबाइल कल्लूने जाताना सोबत नेले होते. कल्लूवर कोलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल असून पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातही मारामारीचा गुन्हा दाखल आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कल्लू याने शेट्टीच्या मोबाइलवरुन दोघांची हत्या केल्याची माहिती नालासोपारा आणि पनवेल येथील नातोवाईकांना दिली. कोलकत्ता येथे त्याच्यावर दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येचा गुन्हाही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.