कोरोना कॉल सेंटरच्या संपर्क क्रमांकाची संख्या दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:26+5:302021-04-01T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी कॉल सेंटरचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्ग वाढत असताना रात्री-अपरात्री कोरोना उपचारासाठी बेड्स उपलब्धतेची माहिती मिळावी यासाठी कॉल सेंटरचे विस्तारीकरण केले आहे. आता कॉल सेंटरवर कोरोना संदर्भातील माहिती २४ तास मिळणार आहे. तसेच आधी ५ हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध होते, ते आता दहापर्यंत वाढवले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होणे सोपे व्हावे, या अनुषंगाने कोरोना कॉल सेंटरचा आढावा महापौर मोहोळ यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या भेटीवेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, शहरातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स ताब्यात घेतल्यानंतर, जवळपास ७ हजार बेड्स कोविडसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच, याशिवाय महापालिकेने सीसीसीचे ५ हजार बेड्स तयार करण्याचे नियोजन केले असून, यापैकी १ हजार २५० बेड्स उपलब्ध झाले आहेत. शिवाय १ हजार ४५० बेड्सची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.