दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 06:42 IST2025-04-17T06:39:07+5:302025-04-17T06:42:36+5:30
राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने जारी केला आहे.

दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
पुणे : संगणकीकरण व मनुष्यबळाचा खर्च वाढल्याचे कारण देत राज्याच्या नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने दस्तांच्या पानांच्या हाताळणी शुल्कात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शुल्क वाढ २० रुपये प्रतिपानावरून ४० रुपये प्रतिपान करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने जारी केला आहे. मात्र, दस्त हाताळणी शुल्कात वाढ करायची असेल तर नोंदणी शुल्क कशासाठी आकारण्यात येते, असा सवाल असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडरने उपस्थित केला आहे.
सध्या राज्यभरात प्रत्येक महिन्यात सरासरी साडेतीन लाख दस्तांची नोंदणी होते. त्यानुसार दरमहा सुमारे सव्वाचार हजार कोटींचा महसूल गोळा होतो. ही शुल्क वाढ ४० रुपये प्रतिपान केल्याने महसुलातही वाढ होणार आहे. परंतु त्याची अचूक आकडेवारी देता येणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वाढ करण्याची दोन कारणे?
नोंदणी मुद्रांक विभागाचे अनेक उपक्रमांत संगणकीकरणाचे प्रमाण वाढले. विविध कामांसाठी ३५ प्रणाली कार्यान्वित आहेत. सॉफ्टवेअर विकास व देखभालीचा खर्च वाढत आहे. नेटवर्कवरील खर्च वाढला.
जिल्हा, विभागीय, राज्यस्तरावर यंत्रणा आहे. त्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क आणि सर्व्हरविषयक कुशल तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्या मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे.