चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार; पत्नीने वार चुकवल्याने ती गंभीर जखमी
By नितीश गोवंडे | Published: August 24, 2023 06:00 PM2023-08-24T18:00:39+5:302023-08-24T18:00:47+5:30
पत्नीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या पायावरती पतीने कुऱ्हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले
पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना ताजी असतानाच, पतीने याच कारणास्तव पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीने वार चुकवल्याने ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल सर्जेराव भोपळे (४०, रा. साक्षी कॉर्नर, कोकाटे गल्ली, पाषाण) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल भोपळे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतो, याच कारणास्तव त्याने बुधवारी बाणेर लिंक रोड, मॅग्लोनिया सोसायटी येथील एका दुकानासमोर पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. वार चुकवण्यासाठी ३८ वर्षीय महिलेने हात समोर केला असता, तीच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तसेच डाव्या पायावरती पतीने कुऱ्हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल भोपळे याला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कपिल भालेराव हे करत आहेत.