स्वबळाच्या बेंडकुळ्यांबद्दल काँग्रेसमध्येच साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:16+5:302021-07-22T04:08:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, ...

Doubts within the Congress about self-determination | स्वबळाच्या बेंडकुळ्यांबद्दल काँग्रेसमध्येच साशंकता

स्वबळाच्या बेंडकुळ्यांबद्दल काँग्रेसमध्येच साशंकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : काँग्रेसचे नेते निवडणूकीसाठी स्वबळाचा आग्रह धरत असले तरी पक्षाच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र त्याबद्दल साशंक दिसत आहेत. नेत्यांनी उगीचच शक्तीचा देखावा करण्याआधी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी असा त्यांचा आग्रह आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढवेल असे वक्तव्य जाहीरपणे केले. त्यावरून सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या घटक पक्षांमध्ये जोरदार धुरळा उडाला आहे. मात्र पटोलेंच्या वक्तव्याला काँग्रेस श्रेष्ठींचाच हिरवा कंदील असल्याचे सांगितले जाते. स्वबळाच्या चर्चेबाबत स्थानिक कार्यकर्त्यांचे मत मात्र वेगळे असून कॉंग्रेसच्या स्वबळाबाबत बहुसंख्यांना शंका आहे.

राज्यातील सरकारमध्ये काँग्रेस सहभागी असली तरी तिसऱ्या क्रमाकांवर आहे. अवघा एक खासदार आणि ४४ आमदार अशी कॉंग्रेसची राज्यातली स्थिती आहे. मोठ्या महापालिकांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नगण्य उरले आहे. पक्षाची नागरिकांशी नाळ तुटली आहे. ती पुन्हा जोडायची तर एकट्याने न चालता कोणाचा तरी हात धरूनच पुढे जायला हवे असे काहीजणांना वाटते.

पुण्यासारख्या बालेकिल्ल्यात पक्षाचा एकही आमदार नाही. सलग तीन वेळा खासदारकीला पराभव झाला. महापालिकेतील ८२ नगरसेवकांची संख्या २९ आणि आता तर फक्त ९ इतकीच उरली आहे. राज्यातील अन्य शहरातली स्थिती यापेक्षा वेगळी नाही, याकडे कॉंग्रेस कार्यकर्ते लक्ष वेधतात.

राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आजही महाविकास आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांपेक्षा मोठाच पक्ष आहे. त्याचा आधार घेत एकत्र राहूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला दबावात ठेवणे शक्य आहे. त्यासाठी नेत्यांनी ठाम राहावे असे अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना वाटते. स्वबळावर लढण्यासारखी स्थिती आज नसल्याचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.

चौकट

सेवादलासह अन्य ‘फ्रंटल’चे मत वेगळे

काँग्रेस सेवा दल तसेच महिला, युवक अशा विविध आघाड्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मात्र एकत्र राहून लढण्यात पक्ष म्हणून राजकीय नुकसान असल्याचे वाटते. पक्षाचा पाया वाढवायचा असेल तर स्वबळावर राहूनच नवी ओळख निर्माण करता येईल. त्यासाठी नेत्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी, गाड्याघोड्यावरुन फिरण्याची सवय बंद करावी असे त्यांना वाटते.

Web Title: Doubts within the Congress about self-determination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.