मानसिक रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणारा ‘डव स्टेप’ कॅफे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 08:59 PM2019-03-06T20:59:05+5:302019-03-06T21:10:41+5:30

स्वत:च्या विश्वातून त्यांना बाहेर काढून  समाजाशी त्यांची नाळ जोडण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  ‘त्या’ दोघींनी मानसिक आजारातून पुर्नवसनाकडे वाटचाल करणा-या या व्यक्तींना  ‘डव स्टेप’ हा कँफे सुरू करून दिला आहे.

'Dove Step' Café, which provides a ray of hope for mental patients | मानसिक रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणारा ‘डव स्टेप’ कॅफे

मानसिक रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण आणणारा ‘डव स्टेप’ कॅफे

Next

नम्रता फडणीस
पुणे : ’ते’ सगळे मिळून  ‘कँफे’ चालवतात. ओके, मग त्यात नवीन काय आहे? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो...पण  ‘ते’ थोडेसे  ‘वेगळे’ आहेत..’कुणी ‘सिझोफ्रेनिक’, कुणी ’ नैराश्यग्रस्त’ तर कुणी  ‘गतीमंद’ आहे. सर्वसामान्यांसारखे असूनही केवळ मानसिक आजाराने ग्रस्त असल्यामुळे समाजात मिसळण्याची त्यांना भीती वाटते. म्हणूनच स्वत:च्या विश्वातून त्यांना बाहेर काढून  समाजाशी त्यांची नाळ जोडण्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  ‘त्या’ दोघींनी मानसिक आजारातून पुर्नवसनाकडे वाटचाल करणा-या या व्यक्तींना  ‘डव स्टेप’ हा कँफे सुरू करून दिला आहे. एकेकाळी स्वत:वरचा ताबा गमावलेल्या या व्यक्ती आता आत्मविश्वासाने हा कँफे सांभाळत आहेत, हेच या ’कँफे’चे फलित आहे!

सुशुप्ती साठे आणि सुप्रिया शिंदे या दोघींनी कँफेच्या माध्यमातून या व्यक्तींचे अंधारलेले आयुष्य प्रकाशमान केले आहे. मानसिक आजारातून सावरलेल्या चार स्त्रिया आणि दोन पुरूष व्यक्ती या कँफेची संपूर्ण जबाबदारी उत्तमपणे सांभाळत आहेत. कँफेमध्ये बेकरी उत्पादनाची विक्री केली जाते. त्या उत्पादनांची यादी करणे, त्याची माहिती देणे, त्याची विक्री करणे, ग्राहकांना ती योग्यपद्धतीने सवर््ह करणे आणि ग्राहकांशी प्रेमाने संवाद साधणे या गोष्टी ते अत्यंत सहजपणे  करतात. त्यामुळे सहा महिन्यातच हा कँफे ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

पुण्यात 1999 सालापासून  चैतन्य मेंटल हेल्थ सेंटर हे मनोरूग्णांच्या पुर्नवसनाचे काम करीत आहे. या सेंटरमध्ये ’सिझोफ्रेनिक’, पर्सनल डिसआॅर्डर’, व्यसनामधून आलेला मानसिक आजार, वयोमानाप्रमाणे आलेले ‘अल्झायमर’,  ‘डिमेंन्शिया’ अशा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींवर उपचार केले जातात. यातील बरेचसे रूग्ण हे निवासी आहेत. ’हाफ वे होम’ द्वारे हे सेंटर चालविले जाते. सेंटरच्या माध्यमातून या व्यक्तींना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, काही ठिकाणी यश मिळाले, पण काही ठिकाणी अपयश
मिळाले. यात समाजाचा दोष नाही पण समाज अशा मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समजून घेऊ शकत नाही. कारण समाजामध्ये प्रबोधन झालेले नाही. या व्यक्तींसाठी आपणच का रोजगाराच्या संधी उपलब्ध करू नयेत? असा विचार पुढे आला आणि त्यातून दि. 10 आॅक्टोबर 2018 मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनी हा  ‘कँफे’ सुरू झाला असल्याची माहिती सुशुप्ती साठे यांनी  ‘लोकमत’शी बोलताना दिली.

’हा कँफे आम्ही सुरू केला असला तरी तो आता जणू त्यांचाच  झाला आहे. इतक्या आपलेपणाने तो हा कँफे चालवित आहेत की आम्हाला विशेष लक्ष द्यावे लागत नाही. उलट लोक आम्हाला नाही तर त्यांना ओळखायला लागली आहेत. याचा आनंद तर आहेच पण यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आला आहे जो अधिक समाधान देणारा असल्याची भावना सुप्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.
कँफे चालविणा-या या व्यक्तींचे चेहरे देखील आनंदाने फुलले होते. त्यातील अनेकांनी आपले अनुभव कथन केले. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो उड्या मारायचा. कधीतरी एकाच ठिकाणी बसून राहायचा. कामाला जायचा नाही, मात्र या ‘कँफेमुळे त्याच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून आला.  त्याविषयी सांगताना तो  म्हणाला, कँफेत मी काय काय वस्तू आहेत ते लिहून ठेवतो. सतत काम चालू असल्यामुळे लक्ष दुसरीकडे जात नाही. एकप्रकारचा आत्मविश्वास आला आहे. तर नैराश्यात बाहेर पडलेल्या ज्येष्ठ महिलेमध्येही कमालीचा उत्साह दिसला. प्रत्येक जण अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या भावना मांडत होते...त्यांच्या यशस्वी कहाण्या नक्कीच थक्क करून गेल्या.

सेंटरने त्यांना मानसिक आजारातून बाहेर काढले पण  ‘कँफे’ने त्यांना जगण्याचा आधार दिला...असा एकच भाव सर्वांच्या चेह-यावर झळकत होता!

 

Web Title: 'Dove Step' Café, which provides a ray of hope for mental patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.