ऐतिहासिक दिलावरखान मशिदीची पडझड
By Admin | Published: May 9, 2017 03:20 AM2017-05-09T03:20:07+5:302017-05-09T03:20:07+5:30
राजगुरुनगर येथील ऐतिहासिक दिलावर खान मशिदीची पडझड होऊ लागली आहे. वास्तूचे दगड सुटून पडल्याने संपूर्ण इमारतीला
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : राजगुरुनगर येथील ऐतिहासिक दिलावर खान मशिदीची पडझड होऊ लागली आहे. वास्तूचे दगड सुटून पडल्याने संपूर्ण इमारतीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. दुर्लक्षित होत चाललेल्या राजगुरुनगर येथील पुरातन वास्तूला शासनाने राष्ट्रीय ठेवा म्हणून जोपासत असताना मात्र त्याच्या संरक्षण व संवर्धनसाठी शासनस्तरावरच उदासीनता दिसून येत आहे.
राजगुरुनगर येथे निजामशाही राजवटीतील दिलावरखान दर्गा व मशीद आहे. शासनाने या वास्तूला राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जोपासले असल्याने ही वास्तू पुरातन खात्याच्या ताब्यात आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वास्तू विकासापासून वंचित राहत असल्याने या वास्तूची पडझड होऊन त्याचे मूळ सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे.
कळसाभोवती जंगली झाडेझुडपे उगवून वास्तूची नक्षीदार दगड सुटू लागले आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासाठी शासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु यादरम्यान फक्त कळसाचे काम झाले असून उर्वरित कामाला मात्र दुर्लक्षित केले गेले. त्यामुळे पावसाचे पाणी दगडी भिंतीतून आतमध्ये येत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. जवळच असलेल्या मशिदीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गेल्या पावसाळ्यात या मशिदीचा काही भाग सुटून त्याचे दगड पडले आहेत. संरक्षक भिंतीच्या दर्शनी बाजूला तार कंपाऊंड मोडकळीस झाल्याने अतिक्रमण होण्याची संभावना निर्माण झाली आहे.
इतिहासाचा वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक पुरातन वास्तू इतिहासकाळाची आठवण देत गेली अनेक वर्षे नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही तग धरून आहेत. शासनाने या वास्तू राष्ट्रीय ठेवा म्हणून जोपासले आहेत. या ऐतिहासिक वास्तूच्या जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या वतीने कामे करून जिल्ह्यातील अनेक वास्तूंचे नूतनीकरण केले आहे.
परंतु त्यामध्ये समाविष्ट असलेल्या राजगुरुनगर येथील दिलावरखान दर्गा व मशीद आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून दुरुस्तीअभावी या वास्तूची पडझड होत आहे. कळसाभोवतालचे दगड सुटून अचानक पडत असल्याने
या वास्तूला भेट देण्यासाठी
येणाऱ्या भाविकांना धोका निर्माण झाला आहे.