डीपी रस्त्यावर डांबराचे ठिगळ लावून केली जातेय बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:09 AM2021-04-06T04:09:33+5:302021-04-06T04:09:33+5:30
पुणे : मौजे लोहगाव-खराडी सर्व्हे नंबर १३४ मधून हायवे रस्त्याला जोडणारा डीपी रस्ता महापालिकेने २००५ च्या विकास ...
पुणे : मौजे लोहगाव-खराडी सर्व्हे नंबर १३४ मधून हायवे रस्त्याला जोडणारा डीपी रस्ता महापालिकेने २००५ च्या विकास आराखड्यात मंजूर केला आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रस्ता पडून आहे. अद्यापपर्यंत हा रस्ता सिमेंट काँक्रीट करून तयार करणे अपेक्षित असताना केवळ डांबर टाकून डागडुजी करण्याचे काम केले जात आहे. रस्ता तयार न करता डांबराचे ठिगळ लावून बोळवण केली जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
नगर हायवे रस्त्यावरून यामार्गे समर्थनगर, आपले घर सोसायटी, जय भवानीनगर येथून ई-ऑन आयटी पार्क, खराडी गावातून खराडी-शिवणे रस्त्याने थेट मुंढवा नदीवरील पुलावर जाता येते. यामुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. पालिकेने लाखो रुपये खर्च करून ६० फूट रुंद असलेला आणि सुमारे ४०० मीटरचा डांबरी रस्ता तयार केला. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांत रस्त्याचे काम झाले नसल्याने तसेच वाहतूक वाढल्याने डांबरी रस्ता खराब झाला असून शोधावा लागत आहे, असे वाहनचालकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी हा रस्ता मूळ मालकांनी अडवला होता. मात्र ‘लोकमत’ने याबाबत आवाज उठवला होता. त्यामुळे तो पुन्हा रहदारीस खुला करण्यात आला.
रस्त्याचे सिमेंटीकरण झाल्यास वाहनचालकांना फायदा
पालिकेकडून डांबरी रस्ता शोधून त्यावर पुन्हा डांबराचे ठिगळ लावले जात आहे. हा प्रकार नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे. या रस्त्यावरच पालिकेने द्रोणाचार्य कुस्ती संकुल बांधले आहे. तर समोरच पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण झाले तर वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. तसेच वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकट
हा प्रश्न मुख्य खात्याचा
याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने सांगितले, की हा प्रश्न मुख्य खात्याचा आहे. त्यामुळे ही बाब क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारात येत नसल्याचे सांगण्यात आले. मुख्य खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.