दाऱ्या घाट मार्गाचा डीपीआर पूर्ण : जुन्नरहून मुंबईला जाणारा सर्वात जवळचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 01:18 PM2019-06-22T13:18:10+5:302019-06-22T13:18:30+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.
जुन्नर : जुन्नरहूनमुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणाऱ्या दाऱ्या घाटाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी शेवटच्या टप्प्यात दाऱ्या घाटाच्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर्स अँड इंजिनिअर्स कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला १ कोटी ५८ लाख रुपयांचे काम दिलेले होते. दाऱ्या घाटाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाल्याने त्यानिमित्ताने जुन्नरकर नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची ७२ वर्षांपासूनची मागणी असणाऱ्या दाऱ्या घाटाच्या मागणीबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे. घाटमाथ्यावरील आंबोली, घाटघर, तर घाटाखाली पळू, सिंगापूर तसेच इतर ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. येथे हे सर्वेक्षण करण्यासाठी मोनार्च कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राघोबा महाले, पंकज सोमवंशी व सहकारी यांनी जीपीएस प्रणाली व ड्रोनने वापर करून हे सर्वेक्षण केले. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील जमिनीचा उंचसखलपणा, मातीपरीक्षण, पाषाणाचे स्वरूप अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आल्यावर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचा अहवाल देण्यात येईल, असे महाले यांनी सांगितले.
*जुन्नरकर नागरिकांचे स्वप्न असणारा दाºया घाट व्हावा, यासाठी आता जुन्नर तालुक्यातील नागरिकांची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची तिसरी पिढी शासनाकडे पाठपुरावा करीत आहे.
*आता आमदार शरद सोनवणे, ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे आमदार किसन कथोरे, शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे कार्यवाह रवींद्र काजळे तसेच सर्वपक्षीय मंडळी, सामाजिक संस्था विविध माध्यमांतून दाºया घाटासाठी पाठपुरावा करीत आहेत.
* विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या अहवालावर शासनाची मंजुरीची मोहर उमटवून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची तरतूद करावी, अशी जुन्नर तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
.........
दाऱ्या घाटासाठी दिवंगत गणपत बोडके, भाऊसो निरगुडकर तसेच इतर मंडळींनी ब्रिटिशकाळात १९४५च्या दरम्यान नाणे घाट, दाऱ्या घाट व्हर्नाकुलर कंपनी स्थापन करून भागभांडवल गोळा केले होते.
*जुन्या पिढीतील कवी दिवंगत नारायण मते, विठ्ठल रासणे, बन्याबापू जोशी, हरिभाऊ शुक्ल यांनी हयातभर दाऱ्या घाटासाठी पाठपुरावा केला होता.