किल्ले ‘राजगड’चा सहा महिन्यांत डीपीआर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:12+5:302021-06-17T04:08:12+5:30
डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार (भाग २) लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजगड ...
डॉ. धनंजय सावळकर : बीओटीतून होणार ‘रोप-वे’; गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार
(भाग २)
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजगड किल्ल्यावर ‘रोप-वे’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोणत्या बाजूने ‘रोप-वे’ करता येऊ शकतो याचा तांत्रिक, भौगोलिक आर्थिकदृष्ट्या सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व गोष्टींचा अभ्यास करून येत्या सहा महिन्यांत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करून शासनाला सादर करणार आहे. तर त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वातून ‘रोप-वे’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी गड, किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे, मंदिर तसेच विविध नैसर्गिक ठिकाणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. ‘रोप-वे’ झाल्यास राजगडावर अनेक सुविधा या अनुषंगाने विकसित होणार आहेत.
------
गडावर हॉटेल होणार नाही
‘रोप-वे’ने येणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेऊन गडावर फक्त पाणी, चहा आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गडावर कोणत्याही प्रकारचे हॉटेल अथवा इतर सुविधा मिळणार नाही. संपूर्ण गड पाहण्यास कमीत कमी चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे चहा, पाणी आणि स्वच्छतागृह या तीनच गोष्टी पुरवण्यात येणार आहे.
------
गडाच्या पायथ्याला हॉटेल अन् निवासाची सोय
‘रोप-वे’च्या निर्मितीमुळे किल्ले राजगडकडे अनेकांचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हॉटेल, कॅफेटेरिया, निवास व्यवस्था, पार्किंग आणि इतर सुविधा या गडाच्या पायथ्याला करण्यात येणार आहे. गडावर यांपैकी काहीही करण्यात येणार नसल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.
------
गडावरील कोणत्याही वास्तूला बाधा होणार नाही
‘रोप-वे’ लँडिंगसाठी जास्तीत जास्त एक गुंठ्याची जागा लागते. एक कॅन्टीन आणि स्वच्छतागृह होईल. यासाठी तशी जागा निवडण्यात येणार आहे. त्यामुळे गडावरील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला बाधा होणार नाही. त्याची पुरेपूर काळजी पुरातत्त्व विभाग आणि पर्यटन विभागाकडून घेण्यात येणार असल्याचे डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.
------
कोट
राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची सुमारे २५ वर्षे राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ट्रेकिंगसाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. या दोन्ही ठिकाणी रोप-वेच्या विकासामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध होईल.
- डॉ. धनंजय सावळकर, पर्यटन संचालक