Pune Metro | शिवाजीनगर-लोणी काळभोर मेट्रोचा डीपीआर १० दिवसांत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:18 PM2022-07-05T15:18:11+5:302022-07-05T15:39:50+5:30
येत्या दहा दिवसांत या मेट्रो मार्गाचा डीपीआर निघणार...
पुणे : पीएमआरडीच्या शिवाजीनगर ते लोणी काळभोर या मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महामेट्रो येत्या १० दिवसांत अंतिम करणार आहे. त्यानंतर तो पुणे महानगर वाहतूक प्राधिकरणाकडे (पुम्टा) सादर केला जाणार असल्याची माहिती पीएमआरडीचे आयुक्त सचिन दिवसे यांनी दिली.
दिवसे म्हणाले, “हा प्रकल्प अहवाल पीएमआरडीएने पूर्ण करून महामेट्रोकडे अवलोकनार्थ दिला आहे. महामेट्रोचा याच मार्गावर स्वारगेट ते खराडी असा प्रकल्प असणार आहे. पीएमआरडीच्या शिवाजीनगर ते लोणी काळभोर या मार्गावर खराडी प्रकल्प पुलगेट ते हडपसर असा एकत्रित येत आहे. त्यामुळे दुहेरी खर्च टाळण्यासाठी महामेट्रो यात आवश्यक ते बदल करणार आहे. हा सुधारित प्रकल्प अहवाल येत्या ८ ते १० दिवसांत तयार होण्याची अपेक्षा आहे.”
हिंजवडी आणि हडपसर औद्योगिक क्षेत्रांना जोडणारी हडपसर-लोणी काळभोर ही लाइन-३ आता महामेट्रोच्या खडकवासला-लोणी काळभोर मार्गाच्या योजनेत विलीन केली जाईल. या एकूण ४५ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची ब्लूप्रिंट तयार करण्यात येणार आहे. ही ब्लूप्रिंट डीएमआरसीकडे पुन्हा पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुम्टाकडे विचारार्थ पाठवावी लागेल, असे ते म्हणाले.
या विस्तारामध्ये सासवड रोड व रेसकोर्स-स्वारगेट भागाचाही विचार केला जाईल, जो खडकवासला ते स्वारगेट आणि एसएनडीटी ते वारजे या महामेट्रोच्या मार्गांशी जोडण्याचा प्रस्तावित आहे, असे दिवसे यांनी सांगितले.