पवना, इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी डीपीआर तयार केला जाणार- उदय सामंत
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: June 22, 2023 03:08 PM2023-06-22T15:08:43+5:302023-06-22T15:09:09+5:30
व्यावसायिकांना चऱ्होलीत १० एकर जागा...
पिंपरी : देहू, आळंदी तीर्थक्षेत्रातून वाहणारी इंद्रायणी आणि पवना नदी स्वच्छ करण्याची वारकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ही मागणी पूर्ण केली जाणार आहे. दोन्ही नद्या स्वच्छ करण्यासाठी विकास आराखडा (डीपीआर) येत्या दोन महिन्यात तयार केला जाणार आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नदी स्वच्छतेच्या कामाला तत्वतः मंजुरी दिली, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी (दि.२२) पत्रकार परिषदेत दिली.
पवना, इंद्रायणी नदी स्वच्छतेबाबत उद्योगमंत्री सामंत यांनी गुरुवारी पिंपरी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पालिकेचे इतर अधिकारी, एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री सामंत म्हणाले, पवना, इंद्रायणी नदी स्वच्छ झाल्या पाहिजे, एमआयडीसीचे पाणी थेट नदीत येत असल्यासंदर्भात उपाय योजना करण्याची वारकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार बारणे यांच्याकडे केली होती. नदी स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही काम सुरू करणार आहोत. नदी सुधारसाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश केले आहेत. तीन महिन्यांत आराखडा तयार होईल. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ऑक्टोबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. एमआयडीसीच्या कंपन्याकडून नदीपात्रात पाणी जात असेल, तर त्यासाठी एसटीपी करायचा की सीईटीपी करायचा यावर निर्णय घेतला जाईल.
व्यावसायिकांना चऱ्होलीत १० एकर जागा
एमआयडीसी भागात डीपी रोडवरील ९२ लहान-मोठ्या व्यावसायिकांचे रोडच्या कामामुळे स्थलांतर होणार आहे. अशा व्यावसायिकांसाठी एक महिन्यापूर्वी बैठक झाली. या बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे व्यावसायिकांना चऱ्होली गावात १० एकर जागा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या व्यावसायिकांना उद्यापासूनही व्यवसाय स्थलांतर करता येऊ शकते. व्यावसायिकांना किती जागा घ्यायची हे असोसिएशन ठरविणार आहे. त्यानुसार जागा ताब्यात देण्याचा बोर्डाचा ठराव चार दिवसात होईल. मात्र, ठरावासाठी व्यावसायिकांना थांबण्याची आवश्यकता नसल्याचेही उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
खडसेंवर अभ्यास करतो अन् बोलतो...
भोसरी एमआयडीसीतील एकनाथ खडसे यांच्या भुखंडाच्याबाबतीत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. आजच्या बैठकीचा विषय हा एकनाथ खडसे नसून एमआयडीसीतील एसटीपी बाबतीत होते. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यास करतो अन् बोलतो.