डॉ. प्रदीप कुरुलकरविरोधात २ हजार पानी दोषारोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 09:26 AM2023-07-01T09:26:05+5:302023-07-01T09:32:29+5:30
Pradeep Kuralkar: पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला प्रदीप कुरूलकर याच्याविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
पुणे: पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा तत्कालीन संचालक (डीआरडीओ) प्रदीप कुरूलकर याच्या विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तब्बल दोन हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
कुरूलकर याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी ही तपासला दिशा देण्यासाठी असून, दोषी असल्याचा पुरावा म्हणून या चाचण्यांचा वापर केला जाणार नाही. तसेच दोषारोपपत्रात त्याचा उल्लेख असणार नाही, असे सरकारी वकिलांनी शुक्रवारी चाचण्यांसंदर्भातील युक्तिवादावेळी सांगितले. पॉलिग्राफ, व्हॉइस लेअर चाचणीच्या मागणीवर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद शुक्रवारी पूर्ण झाला. पुढील सुनावणी ७ जुलै रोजी होणार आहे.
पॉलिग्राफची मागणी
डॉ. कुरुलकरकडून तपासात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्याची पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणी करण्याची मागणी एटीएसने न्यायालयाकडे केली. त्यासाठीचा अर्ज सादर केला आहे.