सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:17 PM2021-04-23T20:17:36+5:302021-04-23T20:33:48+5:30
नॅकचे जनक, युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली.
पुणे : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांनी देशाच्या उच्च शिक्षणाला दिशा दिली आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ' फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया ' असा केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून निगवेकर आजारी होते.सात वर्षापूर्वी त्यांना ब्रेन कॅन्सर झाला होता.सुमारे वर्षभरापासून ते घरीच होते.शुक्रवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास हृदय बंद पडल्याने राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
डॉ.निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची जबाबदारी २०००-२००५ या कालावधीत सांभाळली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पंधरावे कुलगुरू म्हणून त्यांनी १९९८ ते २००० काम पाहिले. देशातील विद्यापीठ, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल ॲसेसमेंट ॲण्ड ॲक्रेडिटेशन कन्सिलचे ते संस्थापक -संचालक होते. पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व मटेरियल सायन्सचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. तसेच पुण्यात सेंटर फॉर ऍडव्हान्स स्टडीज फिजिक्सची स्थापना केले. यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टन ऑंटॅरिओ आदी ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम पाहिले.निगवेकर यांना विविध नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
विद्यापीठ कायद्यातील बदलासाठी राज्य शासनातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. एक उत्तम शिक्षक प्रशासक आणि शिक्षण तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्याच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
---------
निगवेकर यांनी ग्रामीण भागातून येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रमुख पदावर काम केले. विद्यार्थी प्रिय शिक्षक, अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
- डॉ.शां.ब.मुजुमदार, संस्थापक -अध्यक्ष, सिंबायोसिस
-----
नॅकच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण गोष्टी केल्या. यूजीसीमध्ये आपल्या कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्रातून उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक व्यक्ती पुढे आल्या त्यात निगवेकरांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणारा एक मोठा शिक्षणतज्ञ आणि आमचा सहकारी हरपला आहे.
डॉ.राम ताकवले, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
--------
डॉ.अरुण निगवेकर हे उत्कृष्ट शिक्षक, उत्तम शैक्षणिक प्रशासक होते. नॅकचे जनक, यूजीसीचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आशा विविध शैक्षणिक संस्थानवर त्यांनी काम केले. देशाला त्यांचे शैक्षणिक योगदान विसरता येणार नाही.
- डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
------
विद्यार्थीप्रिय शिक्षक, उत्तम प्रशासक, भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक नेतृत्व म्हणून डॉ. निगवेकर यांची कारकीर्द स्मरणात राहील. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि विद्यमान कुलपती डॉ. शिवाजीराव कदम सर यांच्यासह भारती विद्यापीठ परिवाराशी डॉ. निगवेकर यांचे अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते.
- डॉ. विश्वजीत कदम,प्र-कुलगुरू, भारती विद्यापीठ
----------