डॉ. माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ सन्मान; आयुष्यभर प्रामाणिकपणे पर्यावरणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव
By श्रीकिशन काळे | Published: December 10, 2024 07:15 PM2024-12-10T19:15:42+5:302024-12-10T19:16:32+5:30
जगभरात या पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो.
पुणे : आयुष्यभर अतिशय प्रामाणिकपणे पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पुरस्कार ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ-२०२४’ मंगळवारी (दि.१०) जाहीर झाला. जगभरात या पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे. हा पुरस्कार लाइफटाइम ॲचिव्हमेंट कॅटेगरीमध्ये दिला जातो.
डॉ. गाडगीळ यांना यापूर्वी पद्मश्री आणि पद्मभूषण हे भारताचे मानाचे पुरस्कार मिळाले असून, जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत. त्यांचा पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. त्या संशोधनावर एक पुस्तक देखील प्रसिध्द झाले आहे. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला आहे.
डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिध्द झाले आहेत.
ते १९८० च्या दशकापासून पश्चिम घाट संवर्धनासाठी झटत आहेत. त्यासाठी सरकारने समिती गठित केली होती. त्यात गाडगीळ स्वत: प्रमुख होते. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये जाऊन संशोधन करून जे योग्य आहे, तो अहवाल सादर केला होता. परंतु, त्यांचा अहवाल सरकारने स्वीकारला नाही. पश्चिम घाटात प्रचंड खाणी, रस्ते तयार केले जात आहेत. त्यामुळे या सह्याद्रीचे नुकसान होत आहे. त्याविषयीचा आवाज गाडगीळ सातत्याने उठवत आहेत.
मला समाधान आहे की, मी एक शास्त्रज्ञ असून, लोकांसमवेत काम केले. अन्यथा इतर शास्त्रज्ञ असे काम करत नाहीत. ते राजकारणी लोकांच्या दबावाखाली वस्तूनिष्ठ व स्पष्ट असे काम करायला घाबरतात. परंतु, मी गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करतोय. त्यामुळे मी समाधानी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. - डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ