आयुकाचे डॉ. कनक साहा यांना भटनागर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:21+5:302021-09-27T04:12:21+5:30
औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पुरस्कार दिले ...
औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पुरस्कार दिले जातात. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मूलभूत संशोधनाबद्दल ४५ वर्षांच्या आतील शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. कनक साहा यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. तसेच बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतून पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर अमेरिका, तैवान आदी ठिकाणी संशोधन केले. आयुका येथे २०१३ मध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले आहेत.
डॉ. साहा यांचा आकाशगंगांची निर्मिती, उत्क्रांती आणि रचना हा संशोधनाचा विषय आहे. ताऱ्यांमधून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांच्या माध्यमातून आकाशगंगांचे निरीक्षण आणि उत्क्रांतीचा प्रवास उलगडण्याचे काम डॉ. साहा आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या नेतृत्वात ९.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेचा शोध घेण्यात यश आले.