डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; शरद पवारांची केंद्राला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 01:50 PM2024-02-15T13:50:35+5:302024-02-15T13:52:16+5:30
सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या लसमुळेच कोरोनाचा उद्रेक कमी करणे शक्य झाले
पुणे: “जगातील प्रत्येक पाचपैकी तीन मुलांना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. कोरोनाचा उद्रेक त्यांच्या लस उत्पादनामुळेच कमी करता येणे शक्य झाले. त्यामुळे त्यांचे लसीकरणाच्या क्षेत्रातील बहुमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना केवळ पद्मश्री किंवा पद्मभूषण पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आमची केंद्राला विनंती आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी केले.
वनराई फाउंडेशनतर्फे पवार यांच्या हस्ते डॉ. पूनावाला यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव नीलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.
सायरस पूनावाला आणि मी एकाच वर्गात शिकलो; पण अभ्यास कधीच केला नाही. आमचा बहुतांश वेळ महाविद्यालयाच्या कँटीनमध्येच जायचा, असे मिश्कीलपणे सांगत तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात कायम लस कशी करता येईल, याचेच विचार घोळत असायचे. त्यातूनच सिरमचा जन्म झाल्याचे पवार यांनी सांगितले. “डॉ. मोहन धारिया यांनी राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली, राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांची विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे, तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे, असेही पवार म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. पूनावाला म्हणाले, “कपभर चहाच्या किमतीमध्ये लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून देण्यात माझे कुटुंब आणि संस्थेचा मोठा वाटा आहे. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ही संस्था सुरू करताना त्यात डॉ. धारिया यांचे योगदान होते. त्यातून आज कोट्यवधी बालकांचे प्राण वाचत आहेत, ही समाधानाची बाब आहे.”
चव्हाण म्हणाले, “आतापर्यंत हा पुरस्कार राष्ट्र निर्मात्यांना दिला आहे. डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. धारिया यांनी वनराई संस्थेच्या माध्यमातून विकासाला दिशा दिली. त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पूनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे, तर जगाला मोठ्या संकटापासून दूर केले आहे.”