डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या डायरीत ३६ जण हिटलिस्टवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:17 AM2018-11-16T07:17:51+5:302018-11-16T07:18:18+5:30
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोपपत्रासाठी मुदतवाढीची मागणी
पुणे : गौरी लंकेश हत्याप्रकरणात एसआयटीने अमोल काळेला अटक केली आहे. त्याच्याकडे एक डायरी मिळाली असून, त्यात ३६ जणांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना मारण्याचा कट होता. त्यांना नुकतेच पोलीस संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी सीबीआयचे वकील पी. राजू यांनी न्यायालयास दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणात त्यांच्यावर बेकायदा हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषारोपत्र सादर करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अॅड. राजू यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्याकडे केली. याप्रकरणातील अटक आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे यांचे काही ई-मेल मिळाले असून, फरार असलेला आरोपी सारंग अकोलकर याच्यांशी त्याने संवाद केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींनी मोठा कट रचला असून त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केली आहे, असा युक्तिवाद अॅड. राजू यांनी केली
अंदुरेतर्फे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. दाभोलकर हत्या प्रकरणात विनय पवार आणि सारंग अकोलकर मारेकरी असल्याचे सीबीआयने सांगितले. अंदुरे आधीच अटकेत असून त्याच्याविरोधात पुरावे नाहीत.आणखी ९० दिवस त्याला अटकेत ठेवणे त्याच्यावर अन्याय आहे. तपास यंत्रणांनी काय प्रगती झाली याची कारणे सांगणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद पुनावळेकर यांनी केला. याप्रकरणाची सुनावणी आज होईल.
आरएसएसचे नाव घेतले जात नाही
गौरी लंकेश प्रकरणात तपासात ज्या बारा लोकांना अटक केली आहे. त्यातील सहा जणांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचे जबाब दिले आहेत. मात्र, जाणीवपूर्वक ते संघाचे असल्याचे सांगितले जात नाही. सीबीआय सनातन, हिंदू जनजागृती समितीचे नाव घेते. मात्र, आरएसएसचे नाव घेतले जात नाही, असे अॅड. पुनावळेकर यांनी न्यायालयात सांगितले.
शरद कळसकर व्हीसीद्वारे हजर : याप्रकरणातील आरोपी शरद कळसकरला मुंबई कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे (व्हीसी) हजर करण्यात आले. त्याला न्यायाधीशांनी काय सुनावणी सुरू आहे. त्याची बाजू कोण मांडणार आहे, याची माहिती दिली. कळसकरतर्फे त्याचे वकील अॅड. धर्मराज चंडेल शुक्रवारी बाजू मांडणार आहेत.