डॉ दाभोलकर हत्या प्रकरण : पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधात सीबीआयतर्फे आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:48 PM2019-11-20T16:48:49+5:302019-11-20T16:52:39+5:30
Dr. Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धानिर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेल्या आरोपी विक्रम भावे व संजीव पुनाळेकर यांच्यावर सीबीआयने पुणे सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
पुणे : अंधश्रद्धानिर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेल्या आरोपी विक्रम भावे व संजीव पुनाळेकर यांच्यावर सीबीआयने पुणे सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
विक्रम भावे हा ऍड संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून नोकरीस होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येतील शूटर शरद कळसकर याला जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी जेव्हा कर्नाटक पोलिसांनी अटक केले होते, तेव्हा कळसकरच्या नोंदविलेल्या जबाबात त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुले नष्ट करण्याचा सल्ला ऍड पुनाळेकर यांनीच दिला असल्याचे म्हटले होते. त्या प्रकरणात पुनाळेकर आणि भावे या दोघांना अटक झाली होती. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याने रेकी केली होती. त्यामुळे भावे याला अटक झाली होती. यामध्ये पुनाळेकर यांना दोन महिन्यांपूर्वी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर नुकताच भावेच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र तो कोर्टाने फेटाळला होता. त्यामुळे तो सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत.
या पूर्वीच आरोपींच्यावतीने बाजू मांडताना बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयाला सांगितले होते की, भावे विरोधात या प्रकरणात कोणताही गुन्हा होत नाही. ऑक्टोबरमध्ये 2018 मध्ये कळसकर याचा जबाब नोंदविल्यानंतर भावे याला इतक्या उशिरा अटक का करण्यात आली असा प्रश्न युक्तीवादाच्या दरम्यान उपस्थिय केला होता. तसेच ज्या सीबीआयने सुरवातीच्या आरोपपत्रात सारंग अकोलकर आणि विनय पवार हेच डॉ. दाभोलकरांचे शूटर असल्याचे म्हटले होते ते आता शरद कळसकर जबाबावर कसा विश्वास ठेवू शकतात असा देखील प्रश्न ऍड. इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला होता. तसेच भावे हा जामीन दिल्यास कुठेही पळून जाणार नाही. साक्षी पुराव्यात अडथळा आणणार नसल्याचे सांगत तो निष्पाप असल्याचे म्हटले होते. त्याच्या अटकेपूर्वी तो जेव्हा रत्नगिरी येथे होता. त्याला जेव्हा सीबीआयने तापासकमी बोलवले होते तेव्हा तो सीबीआयच्या कार्यालयात तत्काळ हजर झाला होता. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
त्यावर सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी जमीनाला विरोध करताना सांगितले होते की, भावेला निष्पाप म्हणणे चुकीचे आहे. बाँबस्फोटप्रकरणी त्याला १० वर्षे शिक्षा सुनाविण्यात आली आहे. त्या ठिकाणी काही वर्ष शिक्षा भोगल्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याने रेकी केल्याचेही शरद कळसकर याच्या जबाबातून समोर आले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याचा महत्वाचा सहभाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भावे याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तीवाद ऍड. सुर्यवंशी यांनी केला. न्यायालयाने 13 ऑगस्टला सरकारी पक्षाचा अंतिम युक्तिवाद ऐकून निर्णय देत न्यायालयाने भावेचा जामीन फेटाळून लावला होता.