डॉ. दाभोलकर खून प्रकरण; घटनास्थळी उपस्थित असणा-या व्यक्तींचा शोध घेतला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 07:34 PM2023-04-17T19:34:58+5:302023-04-17T19:35:26+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काही लोकांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारींचा 180 पानांचा डेटा वाचला का? वकिलांचा सवाल
पुणे : डॉ. दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर घटनेच्या दरम्यान कोण कोण येऊन गेले? असा हा 352 पानांचा मोबाईल डेटा पोलिसांनी कंपन्यांकडून मिळविला होता. घटनेच्या वेळी त्या डेटामधील कोण कोण व्यक्ती तिथे उपस्थित होत्या याचा शोध घेतला का? असे मुददे उपस्थित करीत सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची बचाव पक्षाच्या वतीने सोमवारी उलटतपासणी घेण्यात आली.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अँड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची 20 आॅगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील, सीबीआयचे तत्कालीन तपासी अधिकारी एस. आर. सिंग यांची सध्या न्यायालयात उलटतपासणी सुरू आहे. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अँड प्रकाश साळशिंगीकर यांनी एस. आर. सिंग यांना विचारले की डॉ. दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर घटनास्थळी कोण कोण येऊन गेले त्यांचा पुणेपोलिसांनी तयार केलेला मोबाईल डेटा पाहिलात का? त्याप्रमाणे व्यक्तींचा शोध घेतलात का? त्यावर सिंग यांनी तो डेटा मी पाहिला नि वाचला होता, पण बाहेर पडताना प्रत्येक व्यक्ती मोबाईल नेतोच असे नाही. घटनास्थळावरून जरी तो व्यक्ती गेला तरी त्याने मोबाईल वापरला तरच रेकॉर्ड तयार होते. त्यामुळे ही कागदपत्रे जोडली नाहीत, कारण ती महत्वाची वाटली नाहीत असे सिंग यांनी नमूद केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काही लोकांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारींचा 180 पानांचा डेटा वाचला का? असे विचारताच सिंग तत्काळ ’हो’ म्हणाले. मात्र हा डेटा त्यांनी न्यायालयात सादर केला नसल्याची माहिती बचाव पक्षाचे अँड प्रकाश साळशिंगीकर यांनी दिली. दरम्यान, उद्याही (दि.18) एस. आर. सिंग यांची उलटतपासणी होणार आहे.